पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; हायकोर्टाच्या लिपिकाला पोलिसांनी आत्महत्येपासून वाचवत केली अटक

पालघर (pragatbharat.com) : पालघर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका २४ तासांच्या थरारक मोहिमेत एका २८ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने केवळ हल्लाच केला नव्हता, तर तो स्वतःचे जीवन संपवण्याच्या तयारीत होता; परंतु पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे वेळेत पोहोचून त्याचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला आणि त्याला बेड्या ठोकल्या.

MPSC च्या मैत्रीचे रक्तरंजित वळण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. १२ जून रोजी तिची ड्युटी संपवून घरी परतत असताना, गोल्डन टॉकीज परिसराजवळ अमोल सिकंदर मुळे याने तिच्यावर कोयत्याने भीषण हल्ला केला आणि तो फरार झाला. तपासात समोर आले आहे की, आरोपी अमोल मुळे हा बॉम्बे हायकोर्टात लिपिक (Clerk) म्हणून काम करत होता. पीडित महिला आणि अमोल या दोघांनीही MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा उत्तीर्ण केली होती. अभ्यासादरम्यान झालेली त्यांची मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि ते विवाह करणार होते.

नकाराने डोक्यात गेली हवा; पूर्वनियोजित हल्ला काही वैयक्तिक कारणांमुळे या महिलेने अमोलशी संपर्क तोडला होता. तसेच, महिलेच्या कुटुंबीयांनी अमोलचा लग्नाचा प्रस्ताव नाकारून तिच्यासाठी दुसरा मुलगा शोधण्यास सुरुवात केली. ही गोष्ट समजताच अमोलचा स्वतःवरील ताबा सुटला. “ती माझी होऊ शकली नाही, तर कोणाचीच होणार नाही,” या विकृत मानसिकतेतून त्याने हल्ल्याचा कट रचला. महिलेच्या रोजच्या येण्या-जाण्याच्या मार्गाची माहिती असल्याने, तो वाटेत दबा धरून बसला आणि तिने गाठताच तिच्यावर वार केले.

एक शेवटचा फोन कॉल आणि पोलिसांची एन्ट्री घटनेनंतर पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. अमोलचा फोन सतत बंद होता. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांशी ‘शेवटचे बोलणे’ करण्यासाठी अमोलने त्याचा मोबाईल चालू केला. याच दरम्यान पोलिसांना त्याचे अचूक लोकेशन मिळाले. पोलीस पथक आधीच ५००-६०० मीटरच्या परिघात तैनात होते, त्यामुळे त्यांनी तातडीने धाव घेतली.

झाडाला दोरी बांधताना पोलिसांनी पकडले पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अमोल एका झाडाला दोरी बांधून फाशी घेण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सांगितले की, यापूर्वी त्याने उंदीर मारण्याचे औषधही खाल्ले होते, पण त्याने त्याचा मृत्यू झाला नाही. पोलिसांनी त्याला आधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि नंतर स्थानिक पोलिसांच्या हवाली केले.

फिर्यादी आनंदराव ज्ञानदेव सावंत यांच्या तक्रारीवरून पालघर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म्स ॲक्टच्या कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत, रवींद्र वानखेडे आणि पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *