मिरा-भायंदर पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल २२.७९ कोटींचा आंतरराज्य एमडी ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; उत्तर प्रदेशातून चौथी फॅक्टरी जप्त

मिरा रोड (pragatbharat.com) : मिरा-भायंदर, वसई-विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने आंतरराज्य स्तरावर चालणाऱ्या अमली पदार्थ निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या ड्रग्ज नेटवर्कशी संबंधित असणारी तब्बल चौथी बेकायदेशीर एमडी (Mephedrone) ड्रग्ज फॅक्टरी शोधून काढून ती उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत उत्तर प्रदेशातून दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणातील एकूण जप्ती आता २२ कोटी ७९ लाख रुपयांवर पोहोचली आहे.

हे अंमली पदार्थांचे जाळे मुंबईतील मालवणी, मनोरी, तेलंगणा, तामिळनाडू आणि आता उत्तर प्रदेशपर्यंत पसरल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गुन्हे शाखेने १६ जून २०२६ रोजी उत्तर प्रदेशातून निलेश पांडे (वय ३५) आणि तस्लीम आरिफ छुट्टन ऊर्फ रज्जाक (वय ३२) या दोन आरोपींना अटक केली. या ड्रग्ज रॅकेटमध्ये आतापर्यंत एकूण २० आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिरा रोड येथील ड्रग्ज नेटवर्कचा ‘डॉक्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दया माणिक मुदनार याच्या संपर्कातून हे आरोपी या काळ्या धंद्यात आले होते.

उत्तर प्रदेशातील कारखान्यातून ड्रग्जची निर्मिती : पोलीस तपासात समोर आले आहे की, आरोपी तस्लीमने उत्तर प्रदेशातील हरडोई जिल्ह्यातील संदिला तहसील परिसरात वर्षभरापूर्वी एक गुप्त ड्रग्ज फॅक्टरी सुरू केली होती. तर नलासोपाऱ्यात राहणारा आरोपी निलेश हा या कारखान्यासाठी लागणारी रसायने (Chemicals) पुरवत होता. या कारखान्यात तयार होणारे एमडी ड्रग्ज मुंबई आणि इतर राज्यांमध्ये वितरीत केले जात होते. एका वेळी या कारखान्यात तब्बल १० किलो सिंथेटिक ड्रग्ज तयार केले जात होते.

२.०७ कोटींचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेने हरडोई येथील कारखान्यावर छापा टाकून १.३ किलो एमडी ड्रग्ज, सुमारे ३०० लीटर मोनो मिथायलामाइन (MMA) हे रसायन, प्रयोगशाळेचे साहित्य आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री जप्त केली आहे. या ताज्या कारवाईत जप्त केलेल्या मालाची किंमत २ कोटी ७ लाख रुपये आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ४ एप्रिल २०२६ रोजी सुरू झाला होता, जेव्हा मिरा रोड येथील नया नगर भागात २.०७ कोटींचे ड्रग्ज सापडले होते. मिरा-भायंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बदाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे आणि पथकाने ही धाडसी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *