बोरीवलीत विश्वासघाताचा धक्कादायक प्रकार! शोरूम व्यवस्थापकानेच चोरले २ कोटींचे ६६ किलो चांदी; कमोडिटी ट्रेडिंगमध्ये पैशांचा जुगार

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईच्या बोरीवली पूर्व भागात विश्वासाला तडा देणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित चांदीच्या शोरूममधील विश्वासू व्यवस्थापकानेच गेल्या ५ महिन्यांत तब्बल ६६ किलो चांदी लंपास केल्याचे उघड झाले आहे. या चोरीच्या चांदीची एकूण किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या प्रकरणी शोरूम मॅनेजरला अटक केली असून, त्याने चोरी केलेली चांदी विकून ते पैसे कमोडिटी ट्रेडिंगमध्ये (Commodity Trading) गुंतवले आणि त्यात त्याला मोठा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे.

४० वर्षांच्या विश्वासाला लावला चुना : मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली पूर्व येथील ‘स्काय सिटी मॉल’मध्ये असलेल्या ‘सिल्व्हर एम्पोरियम रिटेल प्रायव्हेट लिमिटेड’ या शोरूमचे संचालक राहुल कांतीलाल मेहता यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शोरूम मॅनेजर दिपेश राजेंद्रकुमार जैन याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, दिपेशच्या वडिलांनी या कंपनीत तब्बल ४० वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे काम केले होते. वडिलांच्या याच चांगल्या प्रतिमेमुळे आणि शिफारशीमुळे कंपनीने दिपेशला शोरूमचा पूर्ण प्रभार दिला होता. मात्र, दिपेशने ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत कंपनीचा हा विश्वास धुळीस मिळवला.

वार्षिक ऑडिटमध्ये चोरी उघड, डिजिटल पुरावेही मिटवले : शोरूमचा इन-चार्ज असल्याने दिपेशकडे चाव्या, स्टॉक आणि रोख रकमेचे पूर्ण नियंत्रण होते. आर्थिक वर्षाच्या शेवटी जेव्हा कंपनीचे स्टॉक ऑडिट करण्यात आले, तेव्हा तब्बल ६६ किलो चांदीच्या विटा, नाणी आणि दागिने गायब असल्याचे समोर आले. अंतर्गत चौकशीत असे आढळले की, दिपेश शोरूम उघडण्याच्या आधी आणि बंद झाल्यानंतर गुपचूप आत येऊन चांदी चोरत असे. चोरी लपवण्यासाठी त्याने शोरूमच्या ‘Ornet’ नावाच्या सॉफ्टवेअरमधील इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड आणि व्यवहारांची माहिती डिलीट केली होती. तसेच खोटे डिलिव्हरी दस्तऐवज आणि व्हाउचर्स तयार केले होते. पोलिसांनी दिपेश जैन विरुद्ध चोरी, फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि डिजिटल पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *