पिंपरी चिंचवड भाजपच्या विविध आघाड्यांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान; पक्षाचे कार्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे आवाहन

पिंपरी, पुणे (pragatbharat.com) : भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी विविध प्रकोष्ठांच्या (Cells) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित भव्य कार्यकारिणी नियुक्ती सोहळ्यात भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. “भाजप हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असलेला पक्ष असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारधारा आणि केंद्र-राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात,” असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

अनेक प्रकोष्ठांच्या अध्यक्षांची घोषणा : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय, अभियांत्रिकी, ओबीसी मोर्चा, वक्तृत्व प्रशिक्षण आणि दिव्यांग सेलच्या प्रमुखांना जबाबदारी देण्यात आली. आमदार जगताप यांच्या उपस्थितीत चेतन भुजबळ (अध्यक्ष, ओबीसी मोर्चा), डॉ. अमित नेमाने (अध्यक्ष, वैद्यकीय प्रकोष्ठ), संतोष भालेराव (अध्यक्ष, अभियंता प्रकोष्ठ), हरीश आप्पा मोरे (संयोजक, वक्तृत्व प्रशिक्षण प्रकोष्ठ) आणि अंकुश शिर्के (अध्यक्ष, दिव्यांग सेल) यांना नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत निर्धार : शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले की, राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये संघटन विस्तार आणि जनसेवा हेच ध्येय समोर ठेवून काम सुरू आहे. या कार्यक्रमास संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, सरचिटणीस वैशाली खाडये, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, अनुप मोरे, राजू दुर्गे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *