
पिंपरी-चिंचवड (pragatbharat.com) : चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौक परिसरातील अलंकार सोसायटीमध्ये गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेली गंभीर वीज समस्या अखेर मिटली आहे. या परिसरातील मुख्य एलटी (LT) केबल खराब झाल्यामुळे संपूर्ण सोसायटीचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे पाणी उपसण्याची यंत्रणा ठप्प झाली होती आणि इमारतींमधील लिफ्ट सेवा बंद पडली होती. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत वीज आणि पाणी नसल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
आमदार महेश लांडगे यांचा तत्पर पाठपुरावा : सोसायटीमधील या गंभीर समस्येची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी तातडीने महावितरणच्या (MSEDCL) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी केवळ सूचना न देता प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर पाठपुरावा केला. आमदार लांडगे यांच्या सक्रिय हस्तक्षेपानंतर महावितरणने तातडीने पावले उचलत तब्बल १५० मीटर नवीन एलटी केबल टाकण्याचे काम हाती घेतले आणि ते विक्रमी वेळेत पूर्ण केले.
अलंकार सोसायटीतील रहिवाशांनी मानले आभार : नवीन केबल टाकून झाल्यानंतर अलंकार सोसायटीचा वीज व पाणीपुरवठा आता पूर्णपणे पूर्ववत झाला आहे. लिफ्ट सेवा पुन्हा सुरू झाल्याने रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. “नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. भविष्यात अशा तांत्रिक अडचणी पुन्हा उद्भवू नयेत म्हणून महावितरणला कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असे आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले. चार दिवसांच्या त्रासातून मुक्तता झाल्यामुळे अलंकार सोसायटीतील शेकडो रहिवाशांनी समाधान व्यक्त करत आमदार लांडगे यांचे आभार मानले आहेत.



