
ओस्लो (नॉर्वे) (pragatbharat.com) : विद्यार्थ्यांच्या मूळ शिक्षण प्रक्रियेवर आणि बौद्धिक क्षमतेवर होणारा नकारात्मक परिणाम रोखण्यासाठी नॉर्वे सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. नॉर्वेमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जेनरेटिव्ह एआय’ (Generative AI) टूल्सच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. तसेच, मोठ्या मुलांच्या शिक्षणातही या तंत्रज्ञानाच्या वापरावर कडक मर्यादा लागू केल्या जाणार आहेत. देशाचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोअर (Jonas Gahr Stoere) यांनी एका पत्रकार परिषदेत या नव्या धोरणाची अधिकृत घोषणा केली.
“महत्त्वाचे टप्पे वगळण्याचा धोका” – पंतप्रधान जोनास गाहर : पंतप्रधान जोनास गाहर स्टोअर यांनी सांगितले की, “शालेय शिक्षणात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) टूल्सचा अतिवापर केल्यामुळे लहान मुले त्यांच्या शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचे आणि मूलभूत टप्पे वगळण्याचा (Skip) मोठा धोका निर्माण झाला आहे. शाळेमध्ये मुलांनी सर्वप्रथम स्वतः वाचन करणे, लेखन करणे आणि गणिताचे मूलभूत नियम शिकणे सर्वात महत्त्वाचे आहे.” हे नवीन नियम आगामी शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच ऑगस्ट २०२६ च्या अखेरीस लागू केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्टफोन बंदीनंतर आता एआय वर निर्बंध : नॉर्वेमध्ये गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक चाचण्यांमधील गुणांमध्ये (Test Scores) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने २०२४ मध्येच शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यावर पूर्ण बंदी घातली होती, तसेच वर्गामध्ये शिस्त राखण्यासाठी शिक्षकांना अधिकचे अधिकार बहाल केले होते. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे मुलांच्या विचार करण्याच्या आणि शिकण्याच्या क्षमतेवर मर्यादा येत असल्याने, आता थेट ‘जेनरेटिव्ह एआय’वरच निर्बंध लादण्याचा निर्णय नॉर्वे सरकारने घेतला आहे.


