
मुंबई (pragatbharat.com) : लोकप्रतिनिधी म्हणून समाजातील दुःख आणि अडचणींकडे संवेदनशीलतेने पाहणे हीच खरी जबाबदारी असते, याचा प्रत्यय आणून देणारा एक कौतुकास्पद निर्णय राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकरी, मच्छीमार बांधव आणि राज्यातील लांबलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिक संकटात सापडलेले असताना, यंदा २३ जून रोजी होणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. जनतेच्या वेदनांची जाणीव ठेवत त्यांनी वैयक्तिक आनंदोत्सवाला फाटा दिला आहे.
कोकणातील बागायतदार आणि मच्छीमार अडचणीत यंदा हवामान बदलामुळे आणि एल-निनोच्या (El Nino) प्रभावामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस लांबला असून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका कोकणातील आंबा आणि काजू पिकाला बसला असून बागायतदार शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दुसरीकडे, समुद्रामधील बदलत्या परिस्थितीमुळे मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून मंत्री नितेश राणे म्हणाले, “राज्यातील शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिक संकटांचा सामना करत असताना वाढदिवस साजरा करण्यापेक्षा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे आहे.”
कार्यकर्त्यांना ‘गो-सेवा’ आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी त्यांचे सर्व हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटीसाठी न येण्याचे आवाहन केले आहे. प्रत्यक्ष भेटीऐवजी प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यात आणि परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात द्यावा, असा संदेश त्यांनी दिला आहे.
विशेषतः ‘गो-सेवा’ आणि गौसंवर्धनाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, गौमातेची सेवा, गोशाळांना आर्थिक मदत, जनावरांच्या संगोपनासाठी चारा-पाण्याची सोय तसेच समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा. गरीब, गरजू आणि वंचित घटकांना मदत करणे, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता मोहिमा, आणि रक्तदान शिबिरे आयोजित करणे हेच आपल्या वाढदिवस साजरा करण्याचे खरे स्वरूप असावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“जनतेच्या दुःखात सहभागी होणे आणि सेवाभावातून समाजकार्यात योगदान देणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल. तुमचा सेवाभाव हीच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा आहे,” असे सांगत त्यांनी सर्वांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून कौतुक होत आहे.


