
पुणे (pragatbharat.com) : गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पुणे, सातारा, भिवंडी, रत्नागिरी, महाड आणि संपूर्ण कोकणातील विविध भागांमध्ये रविवारी पावसाने जोरदार सरी बरसल्या. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून रखडलेल्या शेतीकामांना वेग आल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार; स्वारगेट परिसर जलमय पुणे शहरात दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. शहरातील हडपसर, सिंहगड रोड, कात्रज, कोंढवा, आणि कोथरूड या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. पहिल्याच जोरदार पावसामुळे स्वारगेटमधील मित्र मंडळ चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते, ज्यामुळे वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड शहरात आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
साताऱ्यातील परळी खोऱ्यात पाऊस; चिपळूणमध्ये भात पिकांना जीवदान
- सातारा: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार बॅटिंग केली. विशेषतः परळी खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना मोठी गती मिळणार असून पेरणीपूर्व तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.
- भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत व्यापाऱ्यांची काही काळ धावपळ उडाली, मात्र नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली.
- रत्नागिरी व रायगड: कोकणातील चिपळूणमध्ये तब्बल १० ते १५ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे सुकत चाललेल्या भात पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथेही सकाळपासून कोंदट वातावरणानंतर मुसळधार पाऊस कोसळला.
पावसासाठी जांभळेश्वर महादेवाला जलाभिषेक एकीकडे पावसाने हजेरी लावली असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यात यंदा मान्सून लांबल्यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील खेड येथे सकल हिंदू समाज आणि शिवभक्त समितीच्या वतीने जांभळेश्वर महादेवाला सामूहिक जलाभिषेक घालण्यात आला. वरुणराजा लवकर प्रसन्न व्हावा आणि पाण्याचे संकट टळावे, यासाठी विशेष धार्मिक विधी करून महादेवाला साकडे घालण्यात आले. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला आहे.


