अन्न व औषध प्रशासनाची आंबेगाव व खेड तालुक्यात धडक कारवाई; १९ लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व खेड तालुक्यात पाच ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत गुटखा, पानमसाला, विनापरवाना अन्नसाठा, सुपारी आणि कृत्रिम रंग वापरलेल्या अन्नपदार्थांसह १९ लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व खेड तालुक्यात पाच ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत गुटखा, पानमसाला, विनापरवाना अन्नसाठा, सुपारी आणि कृत्रिम रंग वापरलेल्या अन्नपदार्थांसह १९ लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

पुणे (pragatbharat.com): पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाची धडक कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यात पाच ठिकाणी तपासणी करून मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण १९ लाख ३ हजार ३७९ रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. आंबेगाव तालुक्यात मंचर येथे साईराज पान अँड टी हाऊस आणि समीक्षा कोल्ड्रिंक जनरल अँड किराणा स्टोअर यांच्या मागील छोट्या गोदामांमध्ये गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मंचर येथील खेमराज फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही आस्थापना विनापरवाना नोंदणी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला मैदा, बेसन, आटा आणि इतर अन्नपदार्थांचा १९ हजार ८८६ किलो साठा नमुना विश्लेषणासाठी घेऊन जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत १० लाख ४९ हजार ३६४ रुपये असल्याची माहिती देण्यात आली.

खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथे उज्ज्वल सुपारी ही आस्थापना विनापरवाना व नोंदणीशिवाय व्यवसाय करत असल्याचे आढळले. येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेली सुपारी अप्रमाणित अथवा असुरक्षित असल्याच्या संशयावरून १ हजार ८९८ किलो वजनाचा ८ लाख १६ हजार १४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

नारे येथील ओम साई फरसाण या आस्थापनेच्या तपासणीदरम्यान फ्राइड ग्रीन वाटाणा या अन्नपदार्थात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याचा संशय आढळून आला. त्यानुसार अन्नपदार्थाचे आणि वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ६८ किलो वजनाचा ७ हजार ४८० रुपयांचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला.

या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकांत साळवे, अभिजित झोडगे, आदित्य जोशी, साकेत सूर्यवंशी आणि नमुना सहाय्यक श्री. साळवे यांच्या पथकाने सहभाग घेतला. कारवाई पुणे विभागाचे सहआयुक्त यांच्या निर्देशान्वये करण्यात आली.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नपदार्थांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर अशी कारवाई आवश्यक आहे. ग्राहकांनीही अन्नपदार्थ खरेदी करताना पॅकिंग, परवाना, गुणवत्ता, मुदत आणि संशयास्पद रंग किंवा वास याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *