वाघोलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश पाचरणे यांचे अल्पशा आजाराने निधन; वाघोली येथे अंत्यसंस्कार संपन्न

वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश भगवान पाचरणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर श्रीक्षेत्र वाघोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. साप्ताहिक प्रगत भारतचे संपादक दत्तात्रय कांबळे यांचे ते मेहुणे होत

पुणे (pragatbharat.com): पुणे जिल्ह्यातील वाघोली गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भगवान पाचरणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वाघोली परिसरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कै. गणेश भगवान पाचरणे हे वाघोली नगर रोड, संत रोहिदास नगर परिसरातील सामाजिक कार्यात सक्रिय होते. ते संत रोहिदास मंडळाचे मार्गदर्शक म्हणूनही ओळखले जात होते. स्थानिक नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून समाजोपयोगी कामांमध्ये त्यांचा सहभाग होता.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे २८ जून २०२६ रोजी मोशी येथील धनश्री हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ४२ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर श्रीक्षेत्र वाघोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती रेश्मा गणेश पाचरणे या वाघोली गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या आहेत.

कै. गणेश पाचरणे यांचा दशक्रिया विधी मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी सकाळी वाघोली गाव, नगर रोड येथील श्रीक्षेत्र वाघेश्वर मंदिर येथे पार पडला. यावेळी वाघोली गावचे नगरसेवक, ग्रामस्थ आणि पाचरणे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्र परिवार, राष्ट्रीय चर्मकार महासंघ तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. साप्ताहिक प्रगत भारतचे संपादक दत्तात्रय कांबळे यांनी कै. गणेश पाचरणे यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *