
पिंपरी (pragatbharat.com) : कचरा व्यवस्थापनात नागरिकांच्या थेट सहभागातून पिंपरी-चिंचवड शहरात एक सकारात्मक आणि पर्यावरणपूरक बदल घडत असल्याचे चित्र समोर येत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘शून्य कचरा संकलन’ (Zero Waste Slum) उपक्रमाला नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या अवघ्या महिनाभराच्या कालावधीत ११.४७ टन कचऱ्याचे थेट स्रोतस्तरावर (उगमस्थानी) यशस्वी विलगीकरण करण्यात आले आहे. या कौतुकास्पद स्वच्छता मोहिमेत शहरातील तब्बल १९ हजार ८०५ घरांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
कचरा वर्गीकरणाची महत्त्वाची आकडेवारी: महानगरपालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, महिनाभराच्या या विशेष मोहिमेत ९.९७ टन ओला कचरा आणि १.५० टन सुका कचरा नागरिकांनी स्वतःहून स्वतंत्रपणे वर्गीकृत करून पालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला. याशिवाय, आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या ६४३ किलो सॅनिटरी कचऱ्याचे अत्यंत सुरक्षित आणि शास्त्रीय पद्धतीने स्वतंत्र व्यवस्थापन करण्यात आले आहे. कचऱ्याच्या या अचूक वर्गीकरणामुळे पुनर्वापर (Recycle) आणि पुनर्निर्मिती प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे.
‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ संकल्पना झाली मजबूत: कचरा डेपोवरील कचऱ्याचा वाढता डोंगर आणि त्यातून निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी पालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. याबाबत बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, “मिळणारा हा प्रतिसाद पिंपरी-चिंचवडकरांच्या पर्यावरणाप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष आहे. स्वच्छ आणि शाश्वत शहर घडविण्यासाठी ही सवय अशीच कायम ठेवावी.” तर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांचे आभार मानत, “नागरिकांचा हा वाढता सहभाग म्हणजे ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही संकल्पना अधिक बळकट करणारा आहे,” असे सांगत चार प्रकारांत कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले.
या मोहिमेच्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, ओला कचरा कंपोस्ट खत निर्मितीसाठी आणि सुका कचरा पुनर्वापरासाठी वापरला जात आहे. घरातूनच ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा वेगळा केल्याने महापालिकेच्या कचरा संकलन आणि प्रक्रियेमध्ये कमालीची कार्यक्षमता निर्माण झाली आहे.


