कंदिवलीत कॅश कलेक्शन व्हॅनमधून ३.४१ लाखांची चोरी; समता नगर पोलिसांकडून माजी कर्मचाऱ्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक, संपूर्ण रक्कम जप्त

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईतील कांदिवली पूर्व भागात एका कॅश कलेक्शन ऑफिसरच्या वाहनातून ३ लाख ४१ हजार २६२ रुपयांची रोकड चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना समता नगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संबंधित कॅश कलेक्शन कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. आरोपींनी अंतर्गत माहितीचा (Insider Knowledge) आणि कलेक्शन रूटचा गैरफायदा घेऊन हा धाडसी घरफोडीवजा चोरीचा प्रकार केला होता. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली सर्वच्या सर्व रक्कम हस्तगत केली आहे.

भरदिवसा ठाकुर व्हिलेज परिसरात झाली होती चोरी: मालाड पूर्व येथील रहिवासी असलेले यश सदानंद राजापूरकर (२७) हे ‘सिक्युरिट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ (Securitrans India Pvt Ltd) या कंपनीत कॅश ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. १२ जून २०२६ रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे २६ खातेदारांकडून एकूण ३,४१,२६२ रुपयांची रोकड गोळा केली आणि ती आपल्या वाहनाच्या डिकीत सुरक्षित ठेवली होती. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी कांदिवली पूर्वेकडील ठाकुर व्हिलेज येथील पिझ्झा हटजवळ आपले वाहन पार्क केले आणि दुसऱ्या एका ग्राहकाकडून पैसे गोळा करण्यासाठी बाजूला गेले. ते परत आले असता त्यांना वाहन गायब दिसले. शोध घेतला असता, काही अंतरावर असलेल्या गणपती टॉवरजवळ त्यांना वाहन सापडले, मात्र वाहनाची डिकी तोडून पैशांची बॅग पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

माजी कर्मचाऱ्यानेच रचला होता चोरीचा कट: या प्रकरणाचा तपास करताना समता नगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. त्यामध्ये हेल्मेट घातलेले दोन तरुण राजापूरकर यांचे वाहन ढकलत नेताना दिसले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरे कॉलनी परिसरातून आर्यन अशोक सकपाळ (१९) याला अटक केली, तर त्याच्यासोबत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

पोलिसी चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य आरोपी आर्यन सकपाळ हा फेब्रुवारी ते मे २०२६ या काळात त्याच कंपनीत कामाला होता. प्रशिक्षणादरम्यान तो दोन दिवस तक्रारदार यश राजापूरकर यांच्यासोबत फिरला होता. त्यामुळे त्याला राजापूरकर यांच्या कलेक्शनचा मार्ग, पैशांची वेळ आणि वाहन उभे करण्याच्या ठिकाणांची खडान् खडा माहिती होती. याच माहितीचा गैरफायदा घेऊन त्याने हा चोरीचा कट रचला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) योगेश राऊत, उपनिरीक्षक राहुल वाळुंजकर आणि अंमलदार राजेश तोंडवलकर, जयेश केणी, अतुल नानांवरे यांच्या पथकाने अत्यंत चाणाक्षपणे या गुन्ह्याचा तपास करून संपूर्ण रोकड जप्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *