मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये महिला कृषी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; २०० हून अधिक शेतकरी महिलांचा गौरव

पिंपरी-चिंचवड:(pragatbharat.com)-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र (देवाभाऊ) फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने शहरात ‘महिला कृषी सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात आयोजित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात २०० हून अधिक शेतकरी महिलांची ओटी भरून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, तर “देवाभाऊ, धन्यवाद!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या हस्ते झाली. याप्रसंगी विधान परिषदेच्या आमदार मा. उमाताई खापरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले. महिलांनी आजवर समाज, कुटुंब आणि शेती क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे त्यांना अधिक बळ, आत्मविश्वास आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे महिला भविष्यात अधिक सक्षमपणे समाजकार्यात आणि विकासाच्या प्रवाहात आपले योगदान देतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.


पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. महिला आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात अत्यंत सक्षमपणे कार्यरत असून, त्यांच्या सक्षमीकरणाला खरी गती मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळात मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. महिलांसाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या, त्यांना ‘लाडकी बहीण’ म्हणून सन्मानाची ओळख मिळाली आणि आता शेतकरी महिलांनाही स्वतंत्र शेतकरी म्हणून हक्काचे व सन्मानाचे स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक निर्णयांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. सुजाता सुनील पालांडे यांनी शासनाच्या विविध महिला कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. महिला या कोणाच्याही स्पर्धेत नसून समाज आणि कुटुंबाच्या विकासात समान जबाबदारीने सहभागी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सन्मानासाठी आणि शेतकरी महिलांच्या हक्कांसाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे महिला वर्गात अभूतपूर्व आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित शेतकरी महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आतापर्यंत शेती क्षेत्रात अहोरात्र कष्ट करूनही त्यांच्या कष्टाची स्वतंत्र शेतकरी म्हणून पुरेशी दखल घेतली जात नव्हती. मात्र, शासनाने घेतलेल्या या ऐतिहासिक व सन्माननीय निर्णयामुळे आता त्या अभिमानाने स्वतःची ओळख “शेतकरी महिला” म्हणून मांडत आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दादासाहेब क्षिरसागर यांनी शेती, महिला सक्षमीकरण आणि शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच राजेश वसावे यांनीही महिलांना अनेक महत्त्वपूर्ण शासकीय योजनांची माहिती दिली.

या भव्य कार्यक्रमास संघटन मंत्री श्री. मोरेश्वर शेडगे, श्री. मधुकर बच्चे, महिला मोर्चाच्या प्रभारी सौ. हर्षदा फरांदे, मा. उपमहापौर शर्मिला बाबर, मा. उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अर्चना तापकीर, स्नेहा कलाटे, आरती चौंधे, रेखा देवकर, राणी पठारे, अनिता काटे, राजश्री लांडगे, शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ. अनघा रुद्र, रोहिणी मांढरे, गायत्री तळेकर, पल्लवी पाठक, स्वाती जाधव, किरण पाचपांडे, जयश्री मखवाना, मनीषा कुलकर्णी, प्रतिमा जवळकर, स्वाती देशमुख तसेच महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, आदरणीय महिला लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी महिला उपस्थित होत्या. विशेष सहकार्य अनुपदादा मोरे यांचे लाभले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ. ऐश्वर्या बाबर यांनी केले, तर महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ. अनघा रुद्र यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची उत्साहात व मंगलमय वातावरणात सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *