उपवर्गीकरण मोर्चांमुळे एस आय आर कडे दुर्लक्ष कराल तर मताधिकार गमवाल – ॲड. सुनील डोंगरे

ॲड. सुनील डोंगरे यांनी दिला.

        साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बहुजन समाज पक्षाच्या वतीने आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे हे होते.

         मौलाना आझाद संशोधन केंद्र, टी. व्ही. सेंटर छ. संभाजीनगर येथे अनुसूचित जातीच्या अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या आरक्षण हक्क परिषदेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना ॲड. सुनील डोंगरे यांनी उपवर्गीकरण समर्थन आणि विरोधी आंदोलनाने आता संवैधानिक नाही तर जातीय स्वरुप घेतल्याची टिका केली. रोज निघणाऱ्या मोर्चांमुळे एस आय आर कडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून जातीयवादी सरकारला हेच अपेक्षित आहे. दलित, मुस्लिम आणि ओ बी सी मतांची टक्केवारी कमी करणे हा एस आय आर मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

           आरक्षण उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिला. त्यानंतर बहन मायावतीजी यांनी २१ ऑगस्ट रोजी भारत बंदचा इशारा दिला होता, त्यात आजचे मोर्चेकरी कुणीही सहभागी झाले नाहीत. या प्रश्नावर संसदेत लढले पाहिजे होते पण अनुसूचित जातीचे १३१ खासदार गप्प बसले. त्यांनी हा विषय नवव्या सूचित का घातला नाही ? दोन वर्ष सारे नेते गप्प बसले. बदर समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर सरकारने हरकती मागविल्या तेंव्हा कुठे दलित नेत्यांना जाग आली आणि ते मोर्चे काढत बसले तर सरकारने एस आय आर आणले. याला हे दलित नेते विरोध का करीत नाहीत ? एक लाख त्रेपण हजार बूथ महाराष्ट्रात आहेत. या मोर्चेकऱ्यांनी किती बी एल ए २ बनविले ? आमचे सर्व आरक्षण उच्चवर्णियांनी खाल्ले. नोकऱ्यांतील आमचा अनुशेष का भरला जात नाही ? म्हणून आता मोर्चा नाही तर बहुजन समाज पार्टी लोकांना समजावून सांगणार आहे. यासाठी ३६ जिल्ह्यात सेमिनार आणि २८८ विधानसभा क्षेत्रात चर्चासत्र घेण्यात येणार असल्याची घोषणा ॲड. सुनील डोंगरे यांनी यावेळी केली.

*”बौद्ध आणि मातंग यांच्यात विभाजन करण्याचा डाव !”*

        प्रमुख वक्ते म्हणून बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व प्रखर व्याख्याते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी यावेळी विषयास अनुसरुन आपले सविस्तर विचार मांडले. बौद्ध आणि मातंग यांच्यात द्वेष पेरुन ऐक्याचे विभाजन करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उपवर्गीकरणामागील डाव असल्याचे आता स्पष्ट होत चालले असून फडणवीस यांची ही घातकी चाल ओळखून आता आम्ही सत्ता कशी आपल्या हातात घेता येईल त्याकडे जास्तीचे लक्ष द्यावे असे आवाहन इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी यावेळी केले.

           प्रमुख उपस्थिती बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव तथा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी मुकुंद सोनवणे (संभाजीनगर) यांची होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला शासनकर्ती जमात बनण्याचा संदेश दिला पण आम्ही फक्त मोर्चेकरी होत आहोत. बाबासाहेबांच्या नावाने टोळ्या तयार झालेल्या आहेत. बहुजन समाज पार्टी तुकड्यांवर समाधान मानत नाही तर देशाची व राज्याची सत्ता हातात घेण्यासाठी काम करीत आहे असे विचार मुकुंद सोनवणे यांनी यावेळी मांडले.

          महिला प्रतिनिधी म्हणून सुप्रसिद्ध वक्त्या रुक्मिणीताई लोंढे यांनीही यावेळी आपले विचार प्रगट केले. आरक्षण उपवर्गीकरण लढ्यामुळे समाज भरकटत चालला आहे. ऐक्यापासून तो दूर जात आहे. स्टेजवर पोतराज आणून समाजाला अंधारात लोटले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बसपाचे प्रदेश सचिव तथा विदर्भ झोन प्रभारी पंडितदादा बोर्डे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. संगीता सुरडकर यांची महिला जिल्हाध्यक्ष म्हणून यावेळी निवड जाहिर करण्यात आली. मंचावर सुनंदा रसाळ, तानाजी गायकवाड (धाराशिव) यांची प्रमुख उपस्थिती होती.

         बहुजन समाज पक्ष छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष-विजय बचके यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर गौतम पारखे यांनी आभार मानले. बाबासाहेब पगारे (लोकसभा प्रभारी), अमोल पवार (जिल्हा उपाध्यक्ष), राघोजी पुंडगे (महासचिव), संघपाल सोनवणे, विष्णू वाघमारे (जिल्हा सचिव), साजिद बाबा (शहराध्यक्ष), दिलीप वर्गाट (प्रसिद्धी प्रमुख), सचिन महापुरे, संदीप जोगदंड, राहुल साळवे, बाळू शिंगारे, सचिन चावरे, सुनील नवतुरे, सिद्धार्थ पवार, कैलास सराटे, महादेव डामरे, दीपक कोळी, नितीन सुट्टे, सिद्धार्थ साळवे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *