पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर….महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची वाहने जमा..

  • राजकीय फलक, पक्षचिन्हे आणि दालनांवरील राजकीय प्रतिमा झाकण्याच्या सूचना…

पिंपरी चिंचवड | (pragatbhatat.com) :- पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, कार्यालयातील राजकीय फलक आणि पक्षचिन्हे झाकण्यात येत आहेत.

महापालिकेच्या वतीने महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेता प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेता भाऊसाहेब भोईर, विविध प्रभाग अध्यक्ष तसेच विषय समित्यांच्या सभापतींना शासकीय वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती.

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शासकीय वाहन वापरणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वाहने महापालिका प्रशासनाकडून जमा करून घेण्यात येत आहेत. खासगी वाहन वापरणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरील पक्षचिन्ह किंवा राजकीय स्वरूपाचे फलक झाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिका भवनातील पदाधिकाऱ्यांच्या दालनांवरील नावाच्या पाट्या, राजकीय व्यक्तींच्या प्रतिमा तसेच पक्षचिन्हे झाकण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. आचारसंहितेचे पालन करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत नगरसचिव मुकेश कोळप यांनी प्रशासनाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *