पुणे (प्रतिनिधी/pragatbharat.com) : पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले प्रतिक गंगणे यांना प्रतिष्ठेचा ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करणे, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे.
येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पुण्यातील नवी पेठ येथील संकल्प बँक्वेट हॉल, एलबीएस मार्ग येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला खादी व ग्रामोद्योग विभागाचे राज्यमंत्री दर्जा असलेले अध्यक्ष रवींद्र साठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रतिक गंगणे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना अभिवादन करत विविध क्षेत्रांतील सेवाभावी व्यक्तींचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे.

पुरस्काराची माहिती पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी दिली.

