पिंपरी (दि. २२ जून २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात १९९७ पासून ठेकेदारामार्फत कार्यरत असलेल्या घंटागाडी सफाई कर्मचाऱ्यांना तब्बल २८ वर्षांनंतर कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर त्यांना सफाई कामगार पदावर नियुक्ती देण्यात आली असून, ३२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या प्रलंबित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने २० ऑगस्ट २०२४ रोजी निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, मात्र ते फेटाळण्यात आले आणि उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहिला. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना अधिकृत शासकीय सेवेत स्थान मिळाले आहे. घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांपैकी ६१ जणांचे निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांना निवृत्तिवेतन, भविष्यनिर्वाह निधी, इतर सर्व शासकीय लाभ मिळतील.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांना आता अधिकृत शासकीय नोकरीत समावेश होणार आहे. त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यांची सफाई कर्मचारी म्हणून महापालिकेत नियुक्ती करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर ३२० कर्मचाऱ्यांना सफाई कामगार म्हणून नोकरी देण्यात आली. त्यातील मृत ६१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाना निवृत्तिवेतनाचा लाभ दिला जाणार आहे. तसेच सफाई कामगार या पदावर पाचव्या वेतन आयोगानुसार ३०५२-४५२० वेतनश्रेणीनुसार १८ ऑगस्ट २००५ पासून नियुक्ती देण्यात आली आहे.
– मनोज लोणकर, उपायुक्त, महापालिका…