
मुंबई : पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारले जात असून ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह काम प्रगतिपथावर आहे. वांद्रे-वर्सोवा, वर्सोवा-दहिसर-भाईंदर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, शिवडी-वरळी एलिव्हेटेड रोड एक वर्षात पूर्ण होणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यात सुरू असलेल्या विविध ३३ प्रकल्पांचा आढावा फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातील ‘वॉररूम’मध्ये घेतला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात विविध प्रकल्प राबविण्यात येत असून ‘वॉररूम’मध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३० प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यापूर्वी झालेल्या दोन बैठकांमध्ये एकूण ३३ प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी सुमारे १३५ मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या निर्णयावरील अंमलबजावणीची माहिती यावेळी देण्यात आली. पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. ‘वॉररूम’मुळे केंद्र, राज्य सरकार व संबंधित अधिकारी जुळले जातात. यामुळे प्रकल्पातील अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी मदत होते, असेही ते म्हणाले.
मंत्रालयातील बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते, तर दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध विभागांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आपल्याकडे तंत्रज्ञान अद्ययावत आहे. त्यामुळे कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत. मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यांचे निराकरण वेळेत करावे. मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत. मेट्रो प्रकल्प वेळेत मार्गी लागण्यासाठी कुशल यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वॉररूमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा !
पायाभूत सुविधा प्रकल्प राबविताना तो वेळेत पूर्ण होईल, याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे. प्रत्येकाचे स्वतंत्र डॅशबोर्ड न करता फक्त सीएम डॅशबोर्डवरच प्रत्येक प्रकल्पाची सद्यःस्थिती नोंदविली गेलीच पाहिजे. प्रकल्पासंबंधित सर्व गोष्टी या डॅशबोर्डवर वेळोवेळी अद्ययावत करण्यात याव्यात. तसेच प्रकल्पातील अडचणी सोडविण्यासाठी वॉररूम आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी पुढील बैठकीपूर्वी पूर्ण करण्यात यावी. आवश्यक अशा बाबींसाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणून ते विषय पूर्णत्वास आणायला हवेत. तसेच आढावा बैठकीतील निर्णयानंतरही काही अडचण आल्यास वॉररूमला कळविण्यात यावे, जेणेकरून त्या अडचणी तातडीने सोडविता येतील. वॉररूमधील प्रकल्पांची तसेच निर्णयांची अंमलबजावणी गांभीर्याने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी सादरीकरणाद्वारे वॉररूम प्रकल्पांची माहिती यावेळी दिली.
या प्रकल्पांना चालना
मुंबईतील मेट्रो लाइन ४, मेट्रो लाइन ५, मुंबई मेट्रो ६, मेट्रो लाइन २ बी (डी.एन. नगर ते मंडाळे), मुंबई मेट्रो ७ ए , मुंबई मेट्रो लाइन ९ (दहिसर (पू) ते मीरा-भाईंदर), ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह टनेल प्रकल्प, बोरिवली ते ठाणे जोड बोगदा प्रकल्प, उत्तन-विरार सीलिंक, शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरिडॉर, पुणे मेट्रो, दहिसर ते भाईंदर लिंक रोड, गोरेगाव मागाठाणे डीपी रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि उत्तर सागरी किनारा मार्ग, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, धारावी पुनर्विकास प्रकल्प, जालना नांदेड महामार्ग, पुणे रिंगरोड, बांद्रा-वर्सोवा सीलिंक, छत्रपती संभाजी नगर शहर पाणीपुरवठा प्रकल्प, कुडूस आरे कनेटिव्हिटी, कुडुस बाभळेश्वर वीज जोडणी प्रकल्प, शिक्रापूर बाभळेश्वर विद्युत प्रकल्प, वाढवण बंदर प्रकल्प.
बीडीडीवासीयांना गणेशोत्सवापूर्वी चाव्या
बीडीडी चाळीतील टप्पा-१ चे काम पूर्ण झाले असून गणेशोत्सवापूर्वी रहिवाशांना चाव्या वाटप करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.