मुंबई:- दादरमध्ये श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघात केला. जे जिंकले त्यांनी मतचोरी कशी केली? हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे. यांचा बुरखाच फाडलेला आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई शिक्षक मतदारसंघातून आपल्या हक्काचा शिवसेनेचा आमदार आपण सगळ्यांनी मेहनत करून निवडून दिला. आज त्यांच्या कार्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. आणि कार्याचा अहवाल ज. मो. अभ्यंकरसाहेब प्रकाशित करताय. मला नाही वाटत यापूर्वी कधी शिक्षक मतदारसंघातल्या आमदाराने त्याचा कार्याचा अहवाल प्रकाशित केला असेल. आपल्या लोकप्रतिनिधीने आपल्या कार्याचा अहवाल प्रकाशित करावा हा दंडक शिवसेनाप्रमुखांचा आहे. आपले नगरसेवक, आमदार, खासदार सगळेच जण आपण गेल्या वर्षी काय-काय केलं. नाहीतर असं होतं की निवडणुकीत वारेमाप आश्वासनं दिली जातात. आणि पाच वर्षांनी तीच आश्वासनं नव्या नावानं पुन्हा दिली जातात. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं तसं नाही. जर तुम्ही एखादं काम करणार असाल तरच बोला आणि जे बोलाल ते करून दाखवा आणि त्यानुसार अभ्यंकरसाहेब तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या त्या शिस्तीला जागून आपल्या पहिल्या वर्षाचा कार्यअहवाल प्रकाशित करताय. अहवाल पूर्ण भरलेला आहे. पोकळपणा त्याच्यात काही नाही. अगदी पुराव्यानिशी अहवाल आहे. कारण त्याच्यामध्ये फोटो आहेत, असे कौतुक उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.