गुजरातमधील कारखाना उद्ध्वस्त; ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहमदाबाद : (pragatbharar.com )गुजरातमधील साबरकांठा येथे डिटर्जंट, युरिया आणि इतर रसायनांचा वापर करून बनावट दूध आणि ताक बनवणारा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे गुजरात पोलिस आणि अन्न आणि औषध विभागाच्या संयुक्त पथकाने श्री सत्य डेअरी प्रॉडक्ट्स नावाच्या कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी पाणी, दूध पावडर, कॉस्टिक सोडा, पाम तेल, सोयाबीन तेल, डिटर्जंट पावडर आणि युरिया यापासून बनावट दूध आणि ताक तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. ३०० लिटर खरे दूध विविध रसायनांमध्ये मिसळून १ हजार ७०० ते १ हजार ८०० लिटर दूध तयार केले जात होते. हे दूध पॅक करून गावांना पुरवले जात होते. पाच वर्षांपासून हा कारखाना सुरू होता.
या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना अटक केली असून, घटनास्थळावरून १ हजार ९६२ लिटर भेसळयुक्त दूध आणि १ हजार १८० लिटर भेसळयुक्त ताक आणि घातक रसायने जप्त केली.
