
पुणे : माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. सुरेश कलमाडी यांच्या कार्यालयाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिले. सुरेश कलमाडी यांच्यावर गेल्या काही काळापासून दीर्घकालीन आजारामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र आज पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव आज दुपारी दोन पर्यंत राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी साडेतीन वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.सुरेश कलमाडी यांनी आपल्या कार्यकाळात राजकीय जबाबदाऱ्यांबरोबरच भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्षपदही भूषवले होते. याशिवाय ते प्रदीर्घ काळ पुण्यातून खासदार म्हणून निवडून जात होते. शिवाय त्यांनी अल्पकाळ रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिला होता.‘पुण्याचे माजी खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी (८१ वर्षे) यांचे पुण्यात निधन झाले. पहाटे साडेतीनच्या सुमारास प्रदीर्घ आजारामुळे उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे त्यांची पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे’, अशी माहिती जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात दिली आहे
