तिरुअनंतपुरम/नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) मोठे यश मिळाले आहे. यूडीएफने सहापैकी चार महापालिकांवर विजय मिळविला आहे. यामध्ये कोल्लम, कोच्ची, त्रिशूर आणि कन्नूर महापालिकेचा समावेश आहे. सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीने (एलडीएफ) कोझीकोड तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) तिरुअनंतपुरम महापालिका जिंकली आहे.

पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्यात 9 आणि 11 डिसेंबर या दोन टप्प्यांत पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल समोर येत आहे. या निवडणुकांसाठी एकूण 73.57 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये 6 महापालिका, 14 जिल्हा पंचायती, 86 नगर पालिका, 152 पंचायत समिती आणि 941 ग्रामपंचायती यांचा समावेश होता. शेवटच्या वृत्तापर्यंत, 941 ग्रामपंचायतींपैकी यूडीएफ 492, एलडीएफ 347 तर एनडीए 25 वर आघाडी घेतली होती. 14 जिल्हा पंचायतींपैकी यूडीएफ 8 वर तर एलडीए 6 वर आघाडी घेतली होती. पंचायत समितीच्या निवडणुकीत यूडीएफने 81 ठिकाणी आघाडी घेत मुसंडी मारली असून, एलडीएने 63 ठिकाणी आघाडी घेतली होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी एलडीएफने सामाजिक सुरक्षा आणि कल्याण सेवानिवृत्ती योजनेत वाढ, आशा कार्यकर्त्यांच्या वेतनात वाढ आणि महिलांसाठी सुरक्षा योजनासह विविध आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर एलडीएफ विचार करावा लागणार आहे. कन्नूर महापालिका कायम राखताना यूडीएफने कोल्लम, त्रिशूर आणि कोच्ची महापालिका एलडीएफकडून हिसकावून घेतली आहे. विशेष म्हणजे, कोल्लम आणि त्रिशूर महापालिका अनुक्रमे 25 आणि 10 वर्षांपासून डाव्या आघाडीच्या ताब्यात होती.
तिरुअनंतपुरममध्ये एनडीएला मोठे यश-काँग्रेसचे नेते शशी थरूर ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या तिरुअनंतपुरम महानगरपालिकेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपचा उदय झाला आहे. यामुळे डाव्या लोकशाही आघाडीची 45 वर्षांची निरंकुश सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तिरुअनंतपुरम महानगरपालिकेतील 101 पैकी 50 वॉर्डमध्ये एनडीएने विजय मिळवला, तर सत्ताधारी एलडीएफला केवळ 29 जागा जिंकता आल्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला 19 जागा जिंकण्यात यश आले. दोन ठिकाणी अपक्षांचा विजय झाला. तसेच, एका वॉर्डमध्ये गेल्या आठवड्यात उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे त्या वॉर्डमधील निवडणूक रद्द करण्यात आली होती.
