पुणे : पुणे ते अहिल्यानगर मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे एसटी विभागाने रामवाडी मेट्रो स्थानक येथे एसटीला थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार महामंडळाच्या सर्व एसटी बस रामवाडी मेट्रो स्थानकाजवळ थांबवण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे प्रवाशांना रामवाडी येथे उतल्यानंतर मेट्रो मधून इच्छितस्थळी प्रवास करणे शक्य होणार आहे.पुणे ते अहिल्यानगर मार्गावर मोठ्या संख्येने बस धावतात. या बस अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, शिर्डीसह मराठवाडा आण विदर्भातील विविध शहरांसाठी प्रवासी वाहतुक करतात. सध्या या बसला अहिल्यानगर मार्गावर गुंजन चौकाच्या पुढे, खराडी बायपासच्या पुढे, वाघोली असे थांबे दिलेले आहेत. या ठिकाणी एसटीचा एक कर्मचारी नेमलेला असतो. आता रामवाडी येथे बसला थांबा दिल्याने प्रवाशांना शहरात इतर ठिकाणी जाणे सोईचे होणार आहे.

रामवाडी मेट्रो स्थानक येथे थांबा सुरू केल्यामुळे एसटी महामंडळाचे अधिकृत शेड उभारणार आहे. याविषयी मेट्रो प्रशासनसोबत बैठक झाली. याचा फायदा कोथरुड, वारजे, स्वारगेट येथून येणार्या प्रवाशांना होणार आहे. रामवाडी येथे बस थांबा दिल्यामुळे प्रवासी मेट्रोने प्रवास करू शकतात.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाकडेवाडीला येणार्या प्रवाशांचा बराच वेळ जातो. रामवाडी येथे थांबा सुरू झाल्यामुळे प्रवासी मेट्रोतून थेट येऊ शकतात, शिवाय वाहतूककोंडीचा होणारा त्रास वाचतो. या थांब्याचा प्रवाशांनी पुरेपूर वापर करावा.
– अरुण सिया, पुणे विभाग नियंत्रक
