पुणे : विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्याहून अबू धाबी थेट विमानसेवेला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता थेट प्रवास करता येणार असून वेळेसह आर्थिक बचत होणार आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसने पुणे-अबू धाबी थेट उड्डाण सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे पुणे विमानतळाच्या जागतिक विस्ताराला मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शहराच्या वाढत्या जागतिक संपर्काच्या मागणीला प्रतिसाद देत सुरू करण्यात आलेली ही सेवा दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार रात्री ९ :१० वाजता पुण्याहून अबू धाबीकडे रवाना होणार आहे. या नव्या मार्गामुळे पुण्याच्या नागरिकांसह व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थ्यांना आणि मध्यपूर्वेत कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुण्याला शिक्षण, आयटी, उत्पादन, स्टार्टअप्स, संशोधन, संरक्षण उद्योग आणि सांस्कृतिक वारसा या विविध क्षेत्रांत देश-विदेशात वेगळी ओळख आहे. अशा पार्श्वभूमीवर थेट आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांची उपलब्धता ही शहराच्या वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. या नव्या उड्डाणामुळे परदेशी गुंतवणूक, व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना अधिक चालना मिळेल. नवी सेवा सुरू झाल्यामुळे पुणे विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा अधिक बळकट झाला आहे. शहराच्या प्रगतीचा मार्ग अधिकच वेगाने खुला होत आहे. पुणे-अबू धाबी थेट उड्डाणाची सुरूवात ही शहराच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाची साक्ष आहे.
मध्यपूर्वेशी कनेक्टिव्हिटी वाढल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला गती मिळाली आहे. पुणे विमानतळाच्या सर्वांगीण विस्तारासाठी प्रयत्नशील आहे. असल्याचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
