अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाण आणि ड्रॅगलॉर्ड आरिफ भुजवाला दोषी! ठाणे न्यायालयाचा २०२१ मधील ड्रग्ज कारखान्याप्रकरणी मोठा निकाल

ठाणे (pragatbharat.com) : महाराष्ट्रातील ड्रग्ज माफिया आणि अंडरवर्ल्डच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनला उघड करणाऱ्या एका अत्यंत हाय-प्रोफाईल प्रकरणात ठाणे विशेष न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक परवेझ नासरुल्ला खान उर्फ चिंकू पठाण (Chinku Pathan) आणि डोंगरीचा कुख्यात ड्रॅगलॉर्ड मोहम्मद आरिफ भुजवाला (Arif Bhujwala) या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २०२१ मध्ये अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) कोट्यवधी रुपयांच्या सिंथेटिक ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये आता न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

समीर वानखेडेंच्या नेतृत्वात झाली होती कारवाई: जानेवारी २०२१ मध्ये एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आणि ठाणे परिसरात मध्यरात्री धाडसी छापे टाकण्यात आले होते. या मोहिमेतून देशातील सर्वात मोठ्या अमली पदार्थ निर्मितीच्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला होता. विशेष न्यायालयाचे विशेष सरकारी वकील (SPP) इराणी यांनी न्यायालयात अंतिम युक्तिवाद सादर केला. न्यायालयाने या प्रकरणात कठोर अशा एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत ५ मुख्य आरोपींना दोषी ठरवले आहे, तर इतर ५ जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.

अशी होती एनसीबीची ‘ऑपरेशन मोडस’: या संपूर्ण कारवाईची सुरुवात एनसीबीने चिंकू पठाणला घणसोली परिसरातून व्यावसायिक प्रमाणात मेफेड्रोन (MD) आणि हेरॉईनसह अटक केल्यानंतर झाली होती. चौकशीदरम्यान चिंकू पठाणने मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या एका गुप्त प्रयोगशाळेची (Clandestine Laboratory) माहिती दिली, जिथून आरिफ भुजवाला हा सिंथेटिक ड्रग्ज बनवत होता. एनसीबीने जेव्हा डोंगरी येथील इमारतीवर छापा टाकला, तेव्हा आरिफ भुजवाला इमारतीच्या बाहेरील लोखंडी पाईपच्या साहाय्याने खाली उतरून पळून गेला होता. मात्र, नंतर एनसीबीने त्याला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून शिताफीने अटक केली.

मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त: या संपूर्ण कारवाईदरम्यान तपास यंत्रणांनी केवळ ड्रग्ज नव्हे, तर गुन्हेगारी सिंडिकेटचे मोठे पुरावे गोळा केले होते. यामध्ये खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला होता:

  • १२ किलोपेक्षा जास्त सिंथेटिक अंमली पदार्थ (ज्यात मेफेड्रोन, मेथॅम्फेटामाइन, एफेड्रिन आणि हेरॉईनचा समावेश होता).
  • अत्याधुनिक स्वयंचलित अग्नेयास्त्रे (Firearms) आणि जिवंत काडतूस.
  • आंतरराष्ट्रीय नेटवर्क उघड करणाऱ्या हवाला-कोडेड डायऱ्या आणि २ कोटी १८ लाख रुपयांची रोख रक्कम.

ठाणे न्यायालयाच्या या निकालामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रग्जचे जाळे पसरवणाऱ्या अंडरवर्ल्डच्या मोठ्या सिंडिकेटला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *