अमेरिकेचे माजी एफबीआय संचालक जेम्स कोमी यांच्यावर गुन्हा दाखल; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

वॉशिंग्टन (pragatbharat.com) : अमेरिकेचे माजी एफबीआय (FBI) संचालक जेम्स कोमी (James Comey) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शारीरिक इजा पोहचवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर फेडरल ग्रँड ज्युरीने दोषारोपपत्र दाखल केले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने मंगळवारी (२८ एप्रिल २०२६) या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.

काय आहे ‘८६ ४७’ प्रकरण? हे संपूर्ण प्रकरण एका सोशल मीडिया पोस्टशी संबंधित आहे. मे २०२५ मध्ये जेम्स कोमी यांनी इन्स्टाग्रामवर समुद्रकिनाऱ्यावरील ‘शिंपल्यांचा’ (Seashells) एक फोटो शेअर केला होता. यामध्ये हे शिंपले ’86 47′ अशा आकड्यांच्या स्वरूपात मांडलेले होते. अमेरिकन भाषेत ’86’ हा शब्द एखाद्याला काढून टाकणे किंवा प्रसंगी ‘ठार मारणे’ यासाठी वापरला जाणारा सांकेतिक शब्द (Slang) आहे, तर ’47’ चा संदर्भ अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जोडला गेला आहे.

न्यायालयीन कारवाई आणि कोमी यांचा पवित्रा: ग्रँड ज्युरीने कोमी यांच्यावर दोन मुख्य गुन्हे नोंदवले आहेत: राष्ट्राध्यक्षांच्या जीविताला धोका निर्माण करणे आणि आंतरराज्यीय स्तरावर धमकी प्रसारित करणे. या गुन्ह्यांसाठी त्यांना कमाल १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, जेम्स कोमी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी केवळ ते शिंपले पाहिले आणि फोटो काढला, माझा कोणताही हिंसक हेतू नव्हता,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने याला ‘प्राणघातक धमकी’ मानत कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. राजकीय वैमनस्यातून ही कारवाई होत असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *