छत्रपती संभाजीनगरमध्ये निलंबित हवालदाराचा धुमाकूळ: स्वतःला पीएसआय सांगून बिल्डरला लुटले, पत्नीलाही दिली ठार मारण्याची धमकी

छत्रपती संभाजीनगर (pragatbharat.com) : शहरात खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निलंबित पोलीस हवालदाराने चक्क पोलीस उपनिरीक्षक (PSI) असल्याचे भासवून एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावत लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, विष्णू सुरेश नानगुडे (उर्फ विष्णू पाटील) असे या निलंबित हवालदाराचे नाव आहे. त्याने गारखेडा परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाची गाडी अडवली. “मी या भागाचा पीएसआय आहे,” असे सांगून त्याने व्यावसायिकाला दमदाटी करण्यास सुरुवात केली. आरोपीने केवळ धमकावलेच नाही, तर व्यावसायिकाच्या गाडीची तोडफोड करत त्याला मारहाणही केली. यानंतर आरोपीने ऑनलाइन पद्धतीने ४० हजार रुपये जबरदस्तीने उकळले आणि व्यावसायिकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी व मोबाईलही हिसकावून घेतला.

हृदयद्रावक बाब म्हणजे, आरोपीने पीडित व्यावसायिकाच्या पत्नीलाही गाठून त्यांना “पुन्हा शहरात दिसलात तर ठार मारीन,” अशी धमकी दिली. या प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करत विष्णू नानगुडे आणि त्याचा चालक रमेश शिंदे या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस दलातून निलंबित असलेला कर्मचारी अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्य करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *