
चिखली (pragatbharat.com): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये टाळगाव चिखली प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक विकास साने यांनी चिखली, चऱ्होली, किवळे, रावेतसह उपनगरांमधील नागरिकांवर लादल्या जाणाऱ्या करप्रणालीवर जोरदार आवाज उठवला.
“पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल करते, मात्र त्या बदल्यात रस्ते, पाणी, लाईट यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी सभागृहात बोलताना केला.
विकास साने यांनी विशेषतः टाळगाव चिखली परिसराचा उल्लेख करत, वाकड आणि थेरगावप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर कर आकारला जात असताना त्या दर्जाच्या महापालिकेकडून नागरी सुविधा मात्र मिळत नसल्याची खंत साने यांनी सभागृहामध्ये बोलताना व्यक्त केली.
सभागृहामध्ये अधिक बोलताना सानेपुढे म्हणाले की,तसेच मोकळ्या जागांवर आणि गाय वासरू असलेल्या गोठ्यांवरही कर आकारला जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रेड झोनमधील नागरिकांना ५०% करसवलतीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रशासनाला जाब विचारत, “ही सवलत प्रत्यक्षात कोणत्या भागांना दिली आहे, याची स्पष्ट माहिती द्यावी,” अशी मागणी केली.
“नागरिकांना सुविधा द्या, मग ते प्रामाणिकपणे कर भरतील. पण सुविधा न देता फक्त कर आकारणी केली तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सभागृहामध्ये महापौर रवी लांडगे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व विविध विषयासंदर्भातील अधिकारी वर्ग तसेच नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास साने यांनी सभागृहामध्ये शेवटी बोलताना सांगितले की पाणीप्रश्नासंदर्भात पुढील सभेमध्येही सविस्तर भूमिका आपण मांडणार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.


