
पुणे (pragatbharat.com) : लग्न ही आयुष्यातील अत्यंत पवित्र गाठ मानली जाते, पण पुण्याच्या एका तरुणाने ही गाठ बांधण्यापूर्वीच रचलेला फसवणुकीचा मोठा डाव चांगलाच अंगलट आला आहे. एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू असतानाही, ती माहिती लपवून दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याचा त्याचा प्रयत्न ‘खऱ्या’ प्रेयसीच्या एन्ट्रीमुळे फसला आहे. लग्नाच्या अवघ्या काही तास आधी नवरदेवाच्या पापाचा घडा भरला आणि त्याला थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे.
इंजिनिअर असल्याचे सांगून जिंकला विश्वास: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर सतीश नेटके (रा. धानोरी, पुणे) याने एका वधू-वर सूचक ग्रुपच्या माध्यमातून धानोरीतील एका २९ वर्षीय सुशिक्षित तरुणीशी ओळख वाढवली होती. आपण एक नामांकित इंजिनिअर असल्याचे खोटे सांगून त्याने मुलीच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर १५ मार्च रोजी मोठ्या थाटामाटात या दोघांचा साखरपुडा पार पडला, ज्यासाठी मुलीच्या वडिलांनी २ लाख रुपये खर्च केले होते. त्यानंतर १३ मे ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती.
हळदीच्या दिवशीच प्रेयसीची ‘धडाकेबाज’ एन्ट्री: सागरच्या घरी ११ मे रोजी हळदीचा कार्यक्रम रंगात आला होता. नातेवाईक जमले होते, गाणी वाजत होती. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात सागरच्या ‘जुन्या’ प्रेयसीने तिथे थेट एन्ट्री घेतली. तिने धाडस दाखवत होणाऱ्या नवरीला आणि तिच्या कुटुंबीयांना सत्य परिस्थिती सांगितली की, “मी सागरची अधिकृत गर्लफ्रेंड असून तो तुमची आणि माझी एकाच वेळी फसवणूक करत आहे!” हे ऐकताच वधू पक्षाच्या पायाखालची जमीनच सरकली.
लाखोंचा गंडा आणि विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई: आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने तात्काळ हे लग्न मोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. लग्नासाठी हॉल, केटरिंग, बस्ता आणि इतर तयारीसाठी मुलीच्या कुटुंबीयांनी सुमारे ८ लाख ३५ हजार रुपये खर्च केले होते. जेव्हा त्यांनी हा खर्च आणि दिलेले दागिने परत मागितले, तेव्हा सागर आणि त्याच्या कुटुंबीयांनी पैसे देण्यास उद्धटपणे नकार दिला.
अखेर पीडित तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ पावले उचलत नवरदेव सागर नेटके याच्यासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करून सागरला बेड्या ठोकल्या आहेत. त्याचे लग्नाचे स्वप्न आता थेट पोलीस कोठडीत विरले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


