
मुंबई (pragatbharat.com) : मुंबईतील अंधेरी पूर्व येथील मरोळ भागात असलेल्या अत्यंत सुरक्षित आणि संवेदनशील राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) प्रादेशिक मुख्यालयात (NSG Regional Hub) घुसून चोरी करण्याचा एक धक्कादायक आणि तितकाच मूर्खपणाचा प्रयत्न समोर आला आहे. कॅम्पच्या आवारातून बांधकामाचे साहित्य चोरून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना एनएसजीच्या कमांडोंनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून रंगेहात पकडले. कमांडोंनी या दोघांना ताब्यात घेऊन चोरीच्या मालासह पवई पोलिसांच्या (Powai Police Station) हवाली केले असून, त्यांच्याविरोधात अधिकृत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. शमीम सलीम शेख (वय ३३) आणि सूरज गर्जन यादव (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरांची नावे आहेत.
अशी उघड झाली चोरी: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास कॅम्पचे सहाय्यक कमांडर बिजेंदर सिंग आणि रेंजर दत्तात्रय सातपुते हे कॅम्प परिसरामध्ये नियमित गस्त (Patrolling) घालत होते. गस्त घालत असताना त्यांना ऑफिसर्स मेसच्या समोरील बाजूस नव्याने सुरू असलेल्या ‘ऑफिसर्स हाऊसिंग प्रोजेक्ट’च्या बांधकामाजवळ दोन संशयास्पद व्यक्ती हालचाली करताना दिसल्या. अधिकारी जेव्हा त्यांच्या दिशेने तपासासाठी गेले, तेव्हा हे दोघे खांद्यावर लोखंडी सळ्यांचे (Iron Rods) मोठे बंडल घेऊन कंपाऊंडच्या भिंतीकडे जाताना दिसले.
भिंतीवरून उड्या मारल्या अन् कमांडो मागे लागले: चोरांनी आधीच आणलेल्या एका शिडीच्या साहाय्याने भिंतीवर चढून लोखंडी सळ्यांचे बंडल कॅम्पच्या बाहेर फेकून दिले होते. मात्र, तितक्यात सुरक्षा रक्षक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच चोरांनी भिंतीवरून खाली उड्या मारल्या आणि अंधाराचा फायदा घेऊन पळू लागले. या घटनेची माहिती मिळताच एनएसजीच्या क्विक रिस्पॉन्स टीमने (QRT) तातडीने सूत्रे हलवली. सहाय्यक कमांडर रणजीत कदम आणि त्यांच्या क्युआरटी पथकाने कॅम्पच्या बाहेरून पळून जाणाऱ्या दोन्ही संशयितांना वेढा घालून जागीच रोखले.
१०० किलो लोखंड जप्त: सुरक्षा पथकाने दोन्ही चोरांना जागेवरच ताब्यात घेतले आणि त्यांनी चोरून भिंतीबाहेर फेकलेला सर्व माल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांकडून ४ फूट लांबीच्या लोखंडी सळ्यांचे एकूण ५ बंडल (वजन सुमारे १०० किलो) आणि एक १० फूट लांबीचा लोखंडी चॅनेल जप्त करण्यात आला आहे. पवई पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून, देशातील सर्वोच्च सुरक्षा यंत्रणेच्या कॅम्पमध्ये घुसण्यामागे त्यांचा केवळ चोरीचाच उद्देश होता की अन्य काही, याचा कसून तपास सुरू केला आहे.


