
नवी दिल्ली (pragatbharat.com) : धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा (Heart Attack) धोका किती वेगाने वाढत आहे, हे दर्शवणारा एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक अहवाल समोर आला आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि संपूर्ण एनसीआर (Delhi-NCR) परिसरातील ३० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांच्या गेल्या ६ महिन्यांतील ४६ टक्के कार्डियाक (हृदय रोग) चाचण्यांचे अहवाल ‘अबनॉर्मल’ (Abnormal) म्हणजेच अनियंत्रित किंवा दोषपूर्ण आढळले आहेत. ‘महाजन इमेजिंग अँड लॅब्स’ने प्रसिद्ध केलेल्या एका विशेष विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.
७८,००० चाचण्यांचे विश्लेषण; चेस्ट एक्स-रेमध्येही दोष हा अहवाल कार्डिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी सेवांमधील तब्बल ७८,००० हून अधिक डायग्नोस्टिक चाचण्यांवर आधारित आहे. यापैकी १३,००० पेक्षा जास्त रुग्णांमध्ये अत्यंत गंभीर किंवा असामान्य लक्षणे आढळून आली आहेत. अहवालानुसार, ४६ टक्के कार्डियाक चाचण्यांमध्ये दोष आढळले आहेत, तर २७ टक्के चेस्ट एक्स-रे (Chest X-Rays) चे अहवाल असामान्य आले आहेत. याशिवाय, सुमारे २ टक्के पॅथॉलॉजी चाचण्यांचे निकाल इतके गंभीर आहेत की त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची (Immediate Medical Attention) गरज आहे.
वयानुसार वाढतोय धोका: ३० ते ४० वयोगटातील तरुणही रडारवर गेल्या ६ महिन्यांत एकूण २४,९५१ कार्डियाक चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ५० टक्के ईसीजी (ECG), ३८ टक्के इकोकार्डियोग्राफी (ECHO), ७ टक्के ट्रेडमिल टेस्ट (TMT) आणि ५ टक्के संयुक्त टीएमटी-इको चाचण्यांचा समावेश होता. चाचण्या करणाऱ्यांमध्ये ५० वर्षांवरील पुरुष सर्वाधिक (५७ टक्के) होते, तर ३० ते ४० वयोगटातील तरुणांचे प्रमाण तब्बल २५ टक्के आणि ४० ते ५० वयोगटातील पुरुषांचे प्रमाण १८ टक्के होते. वयानुसार आजाराचे प्रमाण (Positivity Rate) वाढताना दिसले; ३०-४० वयोगटात हे प्रमाण ११ टक्के, ४०-५० वयोगटात १५ टक्के, तर ५० वर्षांवरील पुरुषांमध्ये २० टक्के इतके नोंदवले गेले.
लक्षणे नसलेले सुप्त आजार घातक; तज्ज्ञांचा इशारा ‘महाजन इमेजिंग अँड लॅब्स’चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. हर्ष महाजन यांनी सांगितले की, “हृदयविकार, उच्च रक्तदाब (Hypertension), मधुमेह (Diabetes), फॅटी लिव्हर आणि किडनीचे विकार हे सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही मोठी किंवा ठळक लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे नागरिक वैद्यकीय तपासणी करत नाहीत आणि आजार सुप्त अवस्थेत वाढत राहतो.” कामाचे वाढते तास, मानसिक ताणतणाव, अपुरी झोप, शारीरिक निष्क्रियता आणि जंक फूडचे सेवन यामुळे पुरुषांमध्ये कार्डिओव्हस्कुलर आणि चयापचयाचे आजार (Metabolic Disorders) वाढत आहेत. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञांनी ३० वर्षांवरील सर्व पुरुषांना नियमितपणे ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप’ (Preventive Health Check-ups) करण्याचा सल्ला दिला आहे.


