देवेंद्र फडणवीसांची ‘रॉयल एनफिल्ड’वरून विधानभवनात एन्ट्री; वर्षा गायकवाडांची PUC वरून टीका, भाजपने दिले चोख उत्तर

मुंबई (pragatbharat.com) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीचे आणि काटकसरीचे आवाहन केल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज रॉयल एनफिल्ड मोटारसायकलवरून विधानभवनात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असून, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नेमका वाद काय? इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन साठा वाचवण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे PUC (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) संपलेले असल्याची टीका केली. तांत्रिक मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न गायकवाड यांनी केला होता.

भाजपचे जोरदार प्रत्युत्तर: वर्षा गायकवाड यांच्या टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावरून चोख उत्तर दिले आहे. बन यांनी स्पष्ट केले की, “ज्या वाहनावरून मुख्यमंत्र्यांनी प्रवास केला, ते वाहन पोलीस विभागाचे आहे. मुख्यमंत्री स्वतः वाहन चालवणार असल्याने पोलिसांनी त्याची योग्य खबरदारी आधीच घेतली होती. कालच या गाडीची सर्व्हिसिंग पूर्ण झाली असून, ‘वाहन प्रणाली’वर ९ ते १८ मे दरम्यान तांत्रिक कामकाज बंद असल्यामुळे पोलिसांनी हे वाहन पर्यावरणीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र आधीच प्राप्त केले होते.”

‘इधर-उधर की बात ना कर’ – भाजपचा टोला: भाजपने पुढे म्हटले की, जनतेच्या मनातून उतरलेली काँग्रेस आता केवळ कागदपत्रांमधील तांत्रिक त्रुटी शोधून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करण्यापूर्वी तथ्य तपासून पाहिले असते, तर त्यांची फजिती टळली असती. “मूळ प्रश्न हा आहे की, तुम्ही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की नाही? तोपर्यंत इधर-उधर की बात ना कर,” अशा शब्दांत भाजपने काँग्रेसला सुनावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *