
पुणे (pragatbharat.com) : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नीट (NEET Exam 2026) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने लातूरचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे (Manoj Shirure) यांना पुण्यातून अधिकृतपणे अटक केली आहे. आरसीसी (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याकडून डॉ. शिरुरे यांनी स्वतःच्या मुलासाठी परीक्षेचा फुटलेला पेपर खरेदी केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरव्यवहारात एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला अटक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
साडेचार तासांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई: डॉ. मनोज शिरुरे हे मूळचे लातूर येथील रहिवासी असून, जुना औसा रोड परिसरात त्यांचे ‘सिद्धिविनायक बाल रुग्णालय’ आहे. रविवारीपासून लातूरमध्ये ठाण मांडून बसलेल्या सीबीआयच्या पथकाने काल संध्याकाळी या रुग्णालयावर छापा टाकला. तेथे डॉ. शिरुरे यांची तब्बल साडेचार तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान सीबीआयने त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल पुरावे जप्त केले. प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे हे मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या थेट संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सीबीआयने त्यांना पुढील तपासासाठी पुण्यात आणले आणि चौकशीअंती अटक केली.
सीबीआय तपासात ‘अशी’ समोर आली मोडस ऑपरेंडी: सीबीआयच्या तपासातून या पेपरफुटीचा अत्यंत सुनियोजित कट समोर आला आहे. मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवर आपले जवळचे साथीदार पी. व्ही. कुलकर्णी (केमिस्ट्री) आणि मनीषा मांढरे (बायोलॉजी) यांची वर्णी लावून घेतली होती. वर्षानुवर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्या या दोघांनी एनटीएच्या पॅनलवर असतानाच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तोंडपाठ केले. त्यानंतर ते प्रश्न हाताने लिहून काढून मोटेगावकरकडे पाठवले. मोटेगावकरने या प्रश्नांच्या पीडीएफ (PDF) फाईल्स बनवून लाखो रुपयांच्या बदल्यात त्यांची विक्री केली. ३ मे रोजी परीक्षा संपल्यानंतर मोटेगावकरने मोबाईलमधील हा डेटा डिलीट करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सीबीआयने हा डेटा रिकव्हर करून त्याचे संपूर्ण नेटवर्क उध्वस्त केले आहे.

