नेपाळमध्ये भीषण अपघात; जलजला येथे जीप ८०० फूट खोल दरीत कोसळली, १७ प्रवाशांचा जागीच मृत्यू

काठमांडू/रोल्पा (pragatbharat.com) : नेपाळच्या लुंबिनी प्रांतातील रोल्पा जिल्ह्यात एक अत्यंत भीषण रस्ता अपघात झाला आहे. थावांग ग्रामीण नगरपालिकेतील जलजला येथे एक जीप ८०० फूट खोल दरीत कोसळल्याने १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही जीप पूर्व रुकुम (Rukum East) येथून प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला.

पाऊस आणि घसरड्या रस्त्यामुळे अपघात: रोल्पा जिल्हा पोलीस कार्यालयाचे प्रवक्ते पोलीस निरीक्षक सुनील थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या भागात सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते अत्यंत घसरडे झाले आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तो रस्ता कच्चा आणि तीव्र उताराचा होता. पावसामुळे जीप चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दरीत कोसळले. जीप रस्त्यापासून सुमारे ८०० मीटर खाली कोसळल्याने मृतांचा आकडा मोठा आहे.

बचाव कार्यात अडचणी: अपघाताची माहिती मिळताच नेपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र, दुर्गम भाग, कच्चा रस्ता आणि सतत पडणारा पाऊस यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, डोंगराळ भागातील प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *