पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिक्कीम दौऱ्यावर; ४००० कोटींच्या विकासकामांची भेट आणि सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थिती

गंगटोक/नवी दिल्ली (pragatbharat.com) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२७ एप्रिल २०२६) दोन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर येत आहेत. सिक्कीम राज्याच्या भारतीय संघराज्यात विलीनीकरणाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘सुवर्ण महोत्सव’ सोहळ्याच्या सांगता समारंभाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी ३ वाजता त्यांचे गंगटोक येथील लिबिंग हेलिपॅडवर आगमन होईल, त्यानंतर तेथून लोकभवनपर्यंत भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यात पंतप्रधान सिक्कीमसाठी ४,००० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यटनाशी संबंधित महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. उद्या, २८ एप्रिल रोजी सकाळी ते गंगटोक येथील ‘ऑर्किडेरियम’ला भेट देतील, जिथे राज्याच्या नैसर्गिक वैभवाचे दर्शन घडवणारे ‘स्वर्णजयंती मैत्री मंजरी पार्क’ विकसित करण्यात आले आहे.

सिक्कीम विद्यापीठाचे कायमस्वरूपी संकुल, यांगंग येथील १०० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय आणि नामची-गंगटोकला जोडणाऱ्या तीस्ता नदीवरील दोन मोठ्या पुलांची पायाभरणी हे या दौऱ्याचे मुख्य आकर्षण आहे. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे ईशान्य भारताच्या विकासाला अधिक वेग मिळणार असून, सिक्कीमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ही एक मोठी भेट मानली जात आहे. गंगटोक शहरात सुरक्षेचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *