
बीड (pragatbharat.com) : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस चिंताजनक वाढ होत असतानाच, बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विश्वासाच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत क्रूर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केला. इतकेच नव्हे, तर हा खून नसून अपघात आहे हे दाखवण्यासाठी मृतदेह दुचाकीखाली दाबून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या ५ दिवसांत या थरारक हत्याकांडाचा छडा लावून पत्नी, प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला पनवेलमधून बेड्या ठोकल्या आहेत.
प्रेमसंबंधातून पतीचा काटा काढण्याचा कट पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे राहणाऱ्या प्रियांका सोनवणे हिचे किरण सोनवणे याच्याशी लग्न झाले होते. मात्र, प्रियांकाचे दशरथ परदेशी या तरुणासोबत सूत जुळले होते. पती किरण हा आपल्या प्रेमसंबंधांच्या आड येत असल्याचे पाहून प्रियांकाने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी तिने प्रियकर दशरथ आणि त्याचा मित्र धीरज येडे यांच्यासोबत मिळून किरणच्या हत्येचा संपूर्ण कट रचला.
गळा आवळून खून आणि अपघाताचा बनाव प्लॅनिंगनुसार, आरोपींनी किरणची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर हा प्रकार घातपात न वाटता केवळ रस्ता अपघात दिसावा, यासाठी त्यांनी किरणचा मृतदेह त्याच्याच दुचाकीखाली दाबून रस्त्याच्या कडेला टाकून दिला. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू वाटत होता, परंतु मृतदेह ताब्यात घेऊन जेव्हा शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात आले, तेव्हा किरणचा मृत्यू अपघाताने नव्हे तर गळा आवळल्याने झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. या अहवालाने पोलीस यंत्रणाही हादरली.
‘कार्यक्रम ओके’चा कोडवर्ड आणि पनवेलमधून अटक नेकनूर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला असता आरोपींचे धागेदोरे हाती लागले. हत्येचा गुन्हा यशस्वी झाल्यानंतर आरोपींनी एकमेकांना फोन करून ‘कार्यक्रम ओके’ असा कोडवर्ड वापरल्याचे तांत्रिक विश्लेषणात समोर आले. संशयित आरोपी बीड सोडून पसार झाले होते. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत नवी मुंबईतील पनवेल परिसरातून प्रियकर दशरथ परदेशी, त्याचा मित्र धीरज येडे आणि मृत किरणची पत्नी प्रियांका सोनवणे या तिघांना अटक केली. पतीच्या कथित जाचाला कंटाळून आणि प्रेमसंबंधांतून हा संपूर्ण कट रचल्याची कबुली आरोपींनी दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


