पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीवर महाराष्ट्र एटीएसचा मोठा प्रहार; राज्यभरात ९ ठिकाणी छापेमारी, सोशल मीडियावरील समर्थकांची होणार चौकशी

मुंबई (pragatbharat.com) : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या माध्यमातून भारतात पसरणारे दहशतीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आज राज्यभरात मोठी धडक कारवाई केली. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील एकूण ९ शहरांमध्ये एकाच वेळी छापेमारी करून एटीएसने संशयितांना दणका दिला आहे. शहजाद भट्टी दुबईतून सोशल मीडियाच्या आधारे भारतीय तरुणांना कट्टरतावाद आणि हेरगिरीच्या दलदलीत ओढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या शहरांमध्ये एटीएसचे छापे: आज सकाळी ८ वाजेपासून एटीएसने मुंबई, पुणे, नालासोपारा, मिरा रोड, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव येथे छापेमारी सुरू केली. सूत्रांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी आणि डोगर गँगशी संबंधित व्यक्ती तसेच सोशल मीडियावर त्यांना समर्थन देणाऱ्या तरुणांची कसून चौकशी केली जात आहे. इंटरनेटवर हिरो बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना भुरळ घालून त्यांना देशविरोधी कारवायांकडे वळवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

कोण आहे शहजाद भट्टी? शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानमधील लाहोरचा रहिवासी असून सध्या तो दुबईतून आपले नेटवर्क चालवत आहे. गेल्या काही महिन्यांत भारतात झालेल्या काही दहशतवादी भरती आणि हेरगिरीच्या प्रकरणांमध्ये भट्टीचे नाव वारंवार पुढे आले आहे. तो विशेषतः सोशल मीडियाचा वापर करून तरुणांशी संपर्क साधतो आणि त्यांना जाळ्यात ओढतो. भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा त्याचा मोठा कट असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.

नेटवर्क मोडीत काढण्यासाठी मोहीम: महाराष्ट्रातील गँगस्टर नेटवर्क आणि सीमापार दहशतवादी संबंध मोडीत काढण्यासाठी एटीएसने ही आक्रमक पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे राज्यातील गँगस्टर जगतात एकच खळबळ उडाली आहे. जे तरुण या गँगस्टरच्या संपर्कात आहेत किंवा त्याला सोशल मीडियावर फॉलो करत आहेत, त्यांची यादी तयार करण्यात आली असून आगामी काळात अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *