
पुणे (pragatbharat.com) : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मंगळवारी पहाटे काळजाचा थरकाप उडवणारी एक भीषण दुर्घटना घडली आहे. महामार्गावरील पवना चौक येथील ओव्हरब्रीजवर एका भरधाव कारचा भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. पहाटे दीड वाजताच्या सुमारास ही भयंकर घटना घडली.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १२, एलडी – ६१५० या क्रमांकाची कार ओव्हरब्रीजवरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट ओव्हरब्रीजवरील लोखंडी कठड्याला जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक लागताच कारच्या इंजिनने पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
मदतीचा प्रयत्न ठरला अपयशी: कुसगाव येथून घरी परतत असलेल्या दिनेश पिंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघाताचा मोठा आवाज ऐकून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा आणि चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत कारमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला होता.
तपास सुरू: अपघातात होरपळून मृत पावलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस कारच्या नोंदणी क्रमांकावरून नातेवाइकांचा शोध घेत आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रात्रीच्या वेळी महामार्गावर वाहन चालवताना वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


