पुणे पर्वती परिसरात संतापजनक घटना! ९ वर्षांच्या नातीवर ५० वर्षीय आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न; मद्यधुंद नराधमाला अटक

पुणे (pragatbharat.com) : पुण्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील पर्वती परिसरात एका ५० वर्षीय नराधमाने आपल्याच ९ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संतप्त नागरिकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव (वय ५० वर्षे) हा मद्यधुंद अवस्थेत होता. दारूच्या नशेत असताना त्याने आपल्या राहत्या घरात पोटच्या नातीसोबत लज्जास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला. नराधमाने चिमुकलीला अश्लील इशारे करत तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. मुलगी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. हा सर्व धक्कादायक प्रकार उघड होताच पर्वतीच्या पायथ्याशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

नागरिकांचा रोष आणि पोलिसांची कारवाई: या घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिक नागरिक आक्रमक झाले. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत घटनास्थळी मोठा राडा झाला. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. आरोपीवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील नसरापूर येथील घटनेची आठवण करून देणाऱ्या या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *