
पुणे (pragatbharat.com) : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अवघ्या १ वर्षाच्या निष्पाप चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र, पुणे शहर गुन्हे शाखा आणि बंडगार्डन पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद व धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या १६ तासांत या चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. सलग १२ तास ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि दौंड येथून दोन महिलांसह तिघांना बेड्या ठोकल्या. प्राथमिक तपासात चाईल्ड ट्राफिकिंगच्या (बाल तस्करी) उद्देशाने हे अपहरण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पतीसोबतचा वाद आणि रेल्वे स्थानकावरील मुक्काम: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय शिवानी अमोल भोसले यांचा पतीसोबत वाद झाला होता. या रागाच्या भरात त्या ३० मे रोजी आपल्या एक वर्षाची मुलगी लीला हिला सोबत घेऊन घर सोडून पुणे रेल्वे स्थानक परिसरात आल्या. राहण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांनी रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयाजवळील दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत रात्री मुक्काम केला होता. रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास शिवानी यांना अचानक जाग आली, तेव्हा त्यांची मुलगी लीला शेजारी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने त्यांनी तातडीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेतली.
सलग १२ तास ७० सीसीटीव्ही तपासले अन् सुटला धागा: घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपासासाठी तीन विशेष पथके तयार केली. पोलिसांनी ३० मे रोजी रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सलग १२ तास रेल्वे स्थानक आणि परिसरातील ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या फुटेजमध्ये एक पुरुष आणि दोन महिला संशयास्पद रितीने चिमुकलीला घेऊन जाताना दिसल्या. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना समजले की, हे संशयित पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून सुटणाऱ्या पनवेल-नांदेड एक्सप्रेसमध्ये बसले आहेत.
दौंड रेल्वे स्थानकात सापळा आणि नाट्यमय अटक: आरोपी रेल्वेने पुढे निघून गेल्याचे समजताच पुणे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा बल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, बार्शी व लातूर येथील स्थानिक पोलिसांना तातडीने हायअलर्ट जारी केला. पोलिसांचे विशेष पथक तातडीने दौंडच्या दिशेने रवाना झाले. ३१ मे रोजी दुपारी पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानक परिसरात यशस्वी सापळा रचून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये द्रुपदा लक्ष्मण गायकवाड (३५), राधा आदिवासी (२०), आणि लकी आदिवासी (२१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोटचा गोळा सुखरूप परत मिळाल्याने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू: पोलिसांनी आरोपींकडून चिमुकली लीला हिची सुखरूप सुटका करून तिला पुण्यात आणले आणि तिच्या आईच्या स्वाधीन केले. अवघ्या १६ तासांच्या या थरारानंतर आपली मुलगी सुरक्षित हातात आल्याचे पाहून आई शिवानी भोसले यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पुणे पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



