
चाकण/पुणे (pragatbharat.com) : विद्येचे माहेरघर मानले जाणारे पुणे शहर आणि जिल्हा सध्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि विनयभंगाच्या घटनांनी हादरून गेले आहे. भोर तालुक्यातील नरसापूर येथील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच, आता चाकण जवळील बिरदवडी येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत अरुण गयाप्रसाद मिश्रा (वय ३२) या परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घरात कोणी नसल्याने घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. हीच संधी साधून आरोपीने घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ११ वर्षीय मुलीने प्रसंगावधान राखत तिथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. उत्तर चाकण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दुसरीकडे, भोरमधील घटनेत ६५ वर्षीय नराधमाने ४ वर्षांच्या चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले असून, त्याचा गुन्हेगारी इतिहास अत्यंत धक्कादायक आहे. पुणे जिल्ह्यात सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

