पुण्यात भरदुपारी सिलिंडरचा भीषण स्फोट: अप्पर डेपो परिसरात आगीचे लोळ; लाखोंचे मंडप साहित्य जळून खाक

पुणे (pragatbharat.com) : पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. शहरात सध्या रणरणते ऊन पडत असतानाच, बिबवेवाडी परिसरातील अप्पर डेपोजवळ भरदुपारी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर परिसरात आगीचे मोठे लोळ पाहायला मिळाले असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि एकच पळापळ झाली.

अत्यंत गजबजलेल्या भागात दुर्घटना: मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तो परिसर अत्यंत गजबजलेला असून आजूबाजूला अनेक दुकाने आणि रहिवासी वस्ती आहे. सिलिंडरचा स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. या स्फोटामुळे शेजारीच असलेल्या मंडप साहित्याला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि आकाशात काळ्या धुराचे लोट दिसू लागले.

अग्निशमन दलाची तत्परता: घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आजूबाजूला अनेक दुकाने असल्याने आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठे संकट टळले आहे.

मोठे आर्थिक नुकसान: या आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, या आगीत साठवून ठेवलेले लाखोंचे मंडप साहित्य जळून खाक झाले आहे. भर उन्हात झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कूलिंगचे काम सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या तापमानामुळे अशा आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *