पोटच्या मुलानेच चोरले आईच्या लग्नाचे दागिने; ड्रग्जच्या व्यसनासाठी कृत्य, अखेर हतबल आईनेच मुलाला पोलिसांच्या हवाली केले!

मुंबई (pragatbharat.com) : ड्रग्जच्या आणि विलासी जीवनशैलीच्या आहारी गेलेली आजची तरुण पिढी किती भयानक पाऊल उचलू शकते, याचा एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक प्रकार मुंबईतील गोरेगाव (पूर्व) परिसरातून समोर आला आहे. आपल्या अमली पदार्थांच्या व्यसनाची हौस भागवण्यासाठी एका २१ वर्षीय तरुणाने चक्क स्वतःच्याच आईच्या लग्नाचे लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घरामधून चोरून विकल्याची घटना घडली आहे. वारंवार विनंती करूनही मुलाने दागिने परत न केल्यामुळे, अखेर एका अत्यंत हतबल आणि उद्विग्न झालेल्या आईने स्वतःच पोलिसांत तक्रार करत पोटच्या मुलाला गजाआड धाडले आहे.

नेमका काय आहे प्रकार? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील संतोष नगर परिसरात राहणारी ५३ वर्षीय महिला ७ एप्रिल २०२६ रोजी आपल्या मूळ गावी गेली होती. गावी जाण्यापूर्वी तिने घरातील लोखंडी पेटीमध्ये तिचे सोन्याचे कानले, पेंडंट, मंगळसूत्र, अंगठ्या आणि पैंजण असे सुमारे ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४०,००० रुपयांची रोकड सुरक्षित असल्याची खात्री केली होती. मात्र, जेव्हा ती १५ एप्रिल रोजी गावाहून परतली, तेव्हा पेटीतील सर्व दागिने आणि रोकड गायब असल्याचे पाहून तिला मोठा धक्का बसला.

आईने जाब विचारताच मुलाची कबुली: घरात कोणतीही तोडफोड न झाल्याने महिलेला तात्काळ तिचा २१ वर्षीय मुलगा (जो ड्रग्जच्या आहारी गेला होता) याच्यावर संशय आला. आईने जेव्हा त्याला कडक शब्दांत जाब विचारला, तेव्हा सुरुवातीला त्याने नकार दिला, मात्र नंतर त्याने चोरीची कबुली दिली. “मी लवकरच सर्व दागिने आणि पैसे परत आणून देईन,” असे आश्वासन त्याने आईला दिले. परंतु, अनेक आठवडे उलटून गेल्यानंतरही त्याने दागिने परत न आणल्यामुळे आणि त्याची उडवाउडवीची उत्तरे ऐकून, अखेर आईने जड अंतःकरणाने दिंडोशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

दिंडोशी पोलिसांची वेगवान कारवाई; २९ ग्रॅम सोने जप्त: पोलीस उपआयुक्त (DCP) महेश चिमटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे आणि पीएसआय अजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने १२ मे २०२६ रोजी आरोपी मुलाला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून २९ ग्रॅम सोन्याचे दागिने यशस्वीपणे हस्तगत केले आहेत.

पोलीस चौकशीत समोर आले की, आरोपी तरुण हा गोकुळधाम परिसरात राहणाऱ्या दोन महिलांकडे वारंवार मुक्कामास जात असे आणि त्यांच्यासोबत ड्रग्जचे सेवन करत असे. त्याने चोरी केलेले दागिने या दोन महिलांच्या हवाली केले होते आणि त्या महिलांनी ते संतोष नगरमधील एका सराफाला विकले होते. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही महिलांना नोटीस बजावली असून, त्यांना पुढील तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *