प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तरच्या ऑफिसमधून १३ लाखांचे ६६ हार्ड डिस्क चोरीला; वांद्रे पोलिसांनी कर्मचाऱ्यासह दोघांना केले अटक

मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्माती झोया अख्तर आणि पटकथालेखक रीमा कागती यांच्या मालकीच्या ‘टायगर बेबी डिजिटल एलएलपी’ (Tiger Baby Digital LLP) या प्रॉडक्शन हाऊसमध्ये एक मोठी चोरीची घटना समोर आली आहे. वांद्रे वेस्ट येथील कार्यालयातील कपाटातून तब्बल १३ लाख रुपये किमतीच्या ६६ हार्ड डिस्क चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी प्रॉडक्शन हाऊसच्या एका कर्मचाऱ्यासह चोरीचा माल विकत घेणाऱ्या अशा दोन जणांना अटक केली आहे.

असा उघडकीस आला चोरीचा प्रकार: प्रॉडक्शन हाऊसमध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आणि एचआर ॲडमिन म्हणून कार्यरत असलेल्या ३६ वर्षीय मेहजबीन मुश्ताक शेख यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २१ मे २०२६ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास कामासाठी एका हार्ड डिस्कची गरज असताना ती शोधण्याचा प्रयत्न केला असता सापडली नाही. कार्यालयातील मुख्य कपाटाची तपासणी केली असता, एकूण ११९ पैकी ६६ महत्त्वाच्या हार्ड डिस्क गायब असल्याचे आणि तिथे फक्त बॉक्सचे जळालेले तुकडे उरल्याचे समोर आले. या हार्ड डिस्कमध्ये अनेक महत्त्वाचे चित्रपट, जाहिराती आणि शूटशी संबंधित मौल्यवान डेटा गोळा करून ठेवण्यात आला होता.

कर्मचाऱ्यानेच केला विश्वासघात: संशयावरून पोलिसांनी कार्यालयातील सपोर्ट स्टाफची चौकशी केली असता, मोहम्मद शाहिद अझीम खान या कर्मचाऱ्याने गेल्या पाच महिन्यांत हळूहळू २५ हार्ड डिस्क चोरल्याची कबुली दिली. त्याने या हार्ड डिस्क बोरिवली येथील रितेश शाह (वय ४४) नावाच्या व्यक्तीला प्रत्येकी १५,००० ते २०,००० रुपयांना विकल्या होत्या. वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून कार्यालयातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज जप्त करून पुढील तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *