
वॉशिंग्टन/दुबई (pragatbharat.com) : आखाती प्रदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून अमेरिकेने आपल्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ मोहिमेची अधिकृत सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या ‘यूएसएस ट्रक्स्टन’ आणि ‘यूएसएस मेसन’ या दोन मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिकांनी (Guided-missile destroyers) इराणचा जोरदार प्रतिकार मोडून काढत हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश केला आहे.
या प्रवासादरम्यान इराणी नौका, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे अमेरिकन युद्धनौकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, मात्र अमेरिकेच्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेने हे सर्व हल्ले परतवून लावले. अमेरिकन सेंट्रल कमांडचे प्रमुख ॲडमिरल ब्रॅडली कूपर यांनी सांगितले की, व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या इराणच्या ६ वेगवान नौका अमेरिकन सैन्याने बुडवल्या आहेत.
या संघर्षाचे लोण आता संपूर्ण परिसरात पसरले असून, इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) फुजैराह येथील तेल शुद्धीकरण केंद्राला लक्ष्य केले आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्याय असलेल्या या केंद्रावर हल्ला करून इराणने जगाचा तेल पुरवठा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, दक्षिण कोरियाच्या एका मालवाहू जहाजावरही स्फोट झाला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाला या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी मात्र याला ‘राजकीय संकट’ म्हटले असून लष्करी कारवाईने प्रश्न सुटणार नाही, असा इशारा दिला आहे.

