बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे ओमानला जाण्याचा प्रयत्न करणारा बांगलादेशी नागरिक मुंबई विमानतळावर अटक; असा झाला पर्दाफाश

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) इमिग्रेशन विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. बनावट भारतीय कागदपत्रांचा (Forged Indian Documents) वापर करून ओमानला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ३० वर्षीय बांगलादेशी नागरिकाला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या मोबाईलमधील काही संशयास्पद कागदपत्रांमुळे त्याचा हा भांडाफोड झाला. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे संशय बळावला मिळालेल्या माहितीनुसार, ‘एस.के. मिल्लन’ या बनावट नावाने प्रवास करणारा हा तरुण बुधवारी सकाळी १०.५० वाजता ओमानला जाणाऱ्या ‘OV762’ या विमानाने एम्प्लॉयमेंट व्हिसावर जाणार होता. जेव्हा तो विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर पोहोचला, तेव्हा तेथील इमिग्रेशन अधिकारी गणेश गवळी यांना त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करताना संशय आला.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली आणि त्याचा मोबाईल फोन तपासला. मोबाईलच्या तपासणीत अधिकाऱ्यांना धक्कादायक पुरावे मिळाले. त्याच्या फोनमध्ये बांगलादेशचे राष्ट्रीय ओळखपत्र (National Identity Card), त्याची पत्नी लिपी परवीन हिच्या बांगलादेशी पासपोर्टची सॉफ्ट कॉपी आणि मुलाच्या व्हिसाशी संबंधित कागदपत्रे आढळून आली.

२०१४ मध्ये केली होती बेकायदेशीर घुसखोरी मोबाईलमधील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपले खरे नाव मोहम्मद असदूर रहमान (वय ३०) असून तो बांगलादेशच्या सातखिरा जिल्ह्यातील श्यामनगरचा रहिवासी असल्याचे कबूल केले. त्याने २०१४ मध्ये भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी केली होती. त्यानंतर त्याने भारतात राहून बनावट जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, डिजिटल रेशन कार्ड आणि इतर बनावट भारतीय ओळखपत्रे तयार केली होती.

याच बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने कोलकाता पासपोर्ट कार्यालयातून (Kolkata Passport Office) भारतीय पासपोर्ट देखील मिळवला होता. पोलिसांनी सध्या त्याचा भारतीय पासपोर्ट, ओमानचा एम्प्लॉयमेंट व्हिसा, बोर्डिंग पास आणि मोबाईल जप्त केला आहे. सहार पोलीस या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा आणि त्याला भारतात बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या एजंटांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *