बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा कडकडाट! अवघ्या एका आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार; रितेश देशमुखने व्यक्त केल्या भावना

मुंबई (pragatbharat.com) : रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी आणि हिंदी दोन्ही आवृत्त्यांमध्ये मिळून पहिल्याच आठवड्यात ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच आठवड्यात ५० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

१० वर्षांचे स्वप्न आणि छत्रपतींच्या वंशजांची दाद: रितेश देशमुखने या चित्रपटासाठी १० वर्षे स्वप्न पाहिले असून गेली साडेतीन वर्षे यावर प्रत्यक्ष काम सुरू होते. कोल्हापूर येथे झालेल्या विशेष स्क्रीनिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे थेट वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटाचे कौतुक केले. “जेव्हा महाराजांच्या वंशजांना चित्रपट आवडतो, तेव्हा एक मोठी जबाबदारी पार पाडल्याचे समाधान मिळते,” अशा शब्दांत रितेशने आपली कृतज्ञता व्यक्त केली.

जेनेलियाची भक्कम साथ: या महाप्रचंड चित्रपटाच्या निर्मितीची धुरा रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने सांभाळली होती. रितेशने दिग्दर्शन आणि अभिनयावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी जेनेलियाने निर्मितीची सर्व जबाबदारी चोख पार पाडली. केतन पुरी यांच्यासह अनेक इतिहासकारांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रपटाची संहिता लिहिण्यासाठी दोन वर्षांचा काळ लागला. या चित्रपटाच्या यशाने मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *