
नवी दिल्ली/मुंबई (pragatbharat.com) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडन सरकारकडून परदेशी राष्ट्रप्रमुखांना दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार, कमांडर ग्रँड क्रॉस’ (Royal Order of the Polar Star, Commander Grand Cross) प्रदान करण्यात आल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर अभिनानाचा वर्षाव होत आहे. भारताचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक दिग्गज खासदारांनी आणि मंत्र्यांनी पंतप्रधानांचे जाहीर अभिनंदन केले असून हा संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानांचा ३१ वा आंतरराष्ट्रीय बहुमान – पीयूष गोयल: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करताना सांगितले की, “हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी राष्ट्रीय अभिमानाचा आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला हा ३१ वा आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मान आहे. हा बहुमान पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी जागतिक नेतृत्वाची प्रचिती देणारा असून, त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आदर आणि पत किती वेगाने वाढत आहे, याचेच हे जिवंत प्रतीक आहे, असे कौतुकोद्गार गोयल यांनी काढले.
धोरणात्मक भागीदारी अधिक घट्ट होणार – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक करत या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ओम बिर्ला म्हणाले की, स्वीडनने दिलेला हा अत्यंत प्रतिष्ठित नागरी सन्मान म्हणजे भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची मोठी पावती आहे. या जागतिक महत्त्वाच्या बहुमानामुळे भारत आणि स्वीडन या दोन्ही लोकशाही देशांमधील मैत्रीचे बंध आणि ‘धोरणात्मक भागीदारी’ (Strategic Partnership) भविष्यात अधिक दृढ व सखोल होईल. हा सन्मान प्रत्येक भारतीयाला देशाच्या प्रगतीसाठी प्रेरित करणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

