महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ: सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला; ‘सिल्व्हर ओक’वरील चर्चेने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

मुंबई (pragatbharat.com) : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना प्रचंड उधाण आले असून, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भेटीचे नेमके कारण काय? सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्यात बराच वेळ खलबतं झाली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भेट केवळ शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी होती. गेल्या काही दिवसांत शरद पवार यांची प्रकृती वारंवार खालावली असल्याने, त्यांच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी तटकरे गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते, या भेटीमागे केवळ प्रकृती हेच कारण नसून काहीतरी राजकीय शिजत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पक्षीय फेरबदल आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव वगळले? ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन यादी सादर केली आहे. या यादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून, जय पवार यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या यादीतून पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे नाव वगळण्यात आल्याची चर्चा सूत्रांकडून समजते. या पार्श्वभूमीवर तटकरे-पवार भेट महत्त्वाची मानली जात आहे.

विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू होणार? अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे आपला विस्तार करत होते. आता सुनील तटकरे यांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने, पडद्यामागे पुन्हा काही हालचाली सुरू झाल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *