
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्रातील मानसिक आरोग्य क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्यातील येरवडा (पुणे), ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे आता पूर्णतः अध्यापन संस्थांमध्ये (Teaching Institutes) रूपांतर करण्यात येणार आहे. हा निर्णय केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेले दूरदर्शी पाऊल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा सरकारचा संकल्प अधिक बळकट होणार आहे.
सुमारे ५,७०० खाटांची क्षमता आणि पायाभूत सुविधांचा वापर: महाराष्ट्रातील ही चारही प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालये सध्या बाह्यरुग्ण (OPD) व आंतररुग्ण (IPD) सेवांद्वारे हजारो रुग्णांना उपचार देत आहेत. या रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे ५,७०० खाटांची (Beds) अवाढव्य क्षमता उपलब्ध आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध असल्याने, या रुग्णालयांचे शैक्षणिक संस्थांमध्ये रूपांतर केल्यास मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचारांसोबतच उच्च शिक्षण आणि संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या योजनेशी सुसंगत पाऊल: केंद्र शासनाच्या ‘मॅनपॉवर डेव्हलपमेंट स्कीम’ अंतर्गत, ‘स्ट्रेंथनिंग पीजी डिपार्टमेंट इन मेंटल हेल्थ स्पेशालिटिज (स्कीम बी)’ या योजनेनुसार मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत (NMHP) या दिशेने विशेष भर देण्यात आला असून, महाराष्ट्राचा हा उपक्रम याच केंद्रीय योजनेशी सुसंगत आहे.
या उच्च दर्जाच्या अभ्यासक्रमांना मिळाली मंजुरी: राज्य शासनाने या संदर्भात आधी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार खालील पदव्युत्तर आणि विशेष डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे: १. एम.डी. सायकिअॅट्री (M.D. Psychiatry) २. एम.फिल क्लिनिकल सायकॉलॉजी (M.Phil Clinical Psychology) ३. एम.फिल सायकियाट्रिक सोशल वर्क (M.Phil Psychiatric Social Work) ४. डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग (Diploma in Psychiatric Nursing)
नागपूर आणि ठाणे-पुण्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात:
- नागपूर: प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून एम.डी. सायकिअॅट्री अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून यशस्वीरित्या सुरू झाला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने चालणाऱ्या या अभ्यासक्रमात दरवर्षी ४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आतापर्यंत १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून २ विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
- नर्सिंग क्षेत्रात प्रगती: ठाणे आणि पुणे (येरवडा) येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात ‘डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग’ हा अभ्यासक्रम सुरू आहे. दोन्ही ठिकाणी दरवर्षी २० विद्यार्थी प्रवेश घेतात. आतापर्यंत ठाणे येथून ५९ आणि पुणे येथून ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामुळे प्रशिक्षित नर्सिंग कर्मचाऱ्यांची मोठी फळी तयार होत आहे.
रुग्णांना आणि आरोग्य व्यवस्थेला होणारे थेट फायदे: या रुग्णालयांचे पूर्णतः अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर झाल्यामुळे रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून अधिक अत्याधुनिक उपचार मिळतील. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील वंचित रुग्णांपर्यंत आरोग्य सेवांचा विस्तार करणे शक्य होणार आहे.


